शिराळा: शिराळा येथील भुईकोट किल्ला येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी स्मृतिस्थळ विकास आराखड्या अंतर्गत समाविष्ट कामा करिता २०२४-२५ साठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी १० कोटीचा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केला असल्याची माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
चिखली (ता.शिराळा) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी नाईक म्हणाले,मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची स्मारकासाठी लागणाऱ्या निधी बाबत भेट घेतली.त्यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी १० कोटी चा निधी सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केला असल्याचे सांगितले. त्यामुळे टेंडर प्रोसेस सुरु होऊन स्मारकाला चांगली गती मिळेल.हा निधी संपल्यानंतर पुढील कामास निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
हे काम नगरपंचायतच्या ताब्यात असणाऱ्या ००.७५ आर या शासकीय जागेत लवकरच सुरु होणारा आहे .९ कोटी ८५ लाख ८२हजार इतका निधी वर्ग केला आहे. त्यामुळे युवकांना प्रेरणादायी ठरणाऱ्या स्मारकाला गती मिळण्यासाठी मदत होणार आहे.मी विधानसभेत असताना जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत जिल्हास्तरीय समितीकडून शासनाला २० कोटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकी नुसार शासनाच्या शिखर समितीने ४ जून २०२४ रोजी पहिल्या टप्प्यात १३ कोटी ४६ लाख ३९ हजार ६६४ रकमेच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली होती.यावेळी विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विराज नाईक उपस्थित होते.
0 Comments