शिराळा,ता.१३ :सांगली जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करून लोकाभिमुख सेवा कशा पुरविता येतील, यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
सांगली येथे शिराळा पंचायत समितीच्या www.psshirala.com या अधिकृत संकेतस्थळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे,ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे,मुख्य वित्त व लेखा अधिकारी चव्हाण,शिराळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, सर्व खाते प्रमुख जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व कर्मचारी दूरदर्शन प्रणाली द्वारे उपस्थित होते.
शिराळा पंचायत समितीच्या psshirala.com या संकेतस्थळावरून ग्रामस्थांना विविध सरकारी योजना,अर्ज फॉर्म्स, सेवा यादी,प्रलंबित कामांची माहिती,गावनिहाय माहिती, ग्रामपंचायतींचे अहवाल,आराखडे,शालेय व ग्रामविकास विषयक तपशील यासारखी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रशासन व ग्रामस्थ यांच्यातील दुवा अधिक दृढ होईल व पारदर्शकता वाढेल.
यावेळी गटविकास अधिकारी पोळ यांनी संकेतस्थळाच्या उद्दिष्टांची माहिती दिली.यावेळी उपस्थित सर्वांनी संकेतस्थळाचे थेट डेमो पाहून समाधान व्यक्त केले व डिजिटल भारताच्या संकल्पनेशी सुसंगत असे हे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागाचे संकेतस्थळ तयार करावयाचे होते.त्यानुसार पंचायत समिती शिराळाचे अतिशय छान, सुटसुटीत,सोपे संकेतस्थळ तयार करण्यात आलेले आहे. जेणेकरून नागरिकांना घरबसल्या विविध उपक्रम,योजना यांची माहिती पाहता येईल.भविष्यात पंचायत समिती अंतर्गत विविध योजनांचे अर्ज ही घरबसल्या ऑनलाइन स्वरूपात करता येतील असे नियोजन वेबसाईटच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे.
-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिराळा.
0 Comments