शिराळा :चांदोली राष्ट्रीय उद्यानातील खुंदलापूर धनगरवाडा व जानाईवाडी येथील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील वन विभागाचा संपादित शेरा कमी करण्यास मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन्यजीव मंडळाच्या बैठकीत दिली आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने झाला असल्याची माहिती आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली वन्यजीव मंडळाची बैठक पार पडली.बैठकीला वन मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविण परदेशी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, प्रधान मुख्य वन संरक्षक(वनबल) शोमिता बिश्वास, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव उपस्थित होते.
यावेळी आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, अभयारण्यग्रस्त खुंदलापूर धनगरवाडा येथील 684 हेक्टर क्षेत्र व जानाईवाडी येथील 73.09हेक्टर क्षेत्रावर वन विभागाचा संपादनाचा शेरा होता. गेली 30 वर्षापासून हा शेरा कमी करण्यासाठी प्रयत्न आम्ही करत होतो.परंतु त्याला यश येत नव्हते. वनविभागाचा संपादनाचा शेरा असल्याने येथील शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नव्हता. पी. एम.किसान योजना, नमो सन्मान योजना, शेतकऱ्यांना कर्ज,कोणतेही शासकीय अनुदान यापासून शेतकरी व ग्रामस्थ वंचित राहत होते. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वन मंत्री गणेश नाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो त्यानुसार वन्यजीव मंडळाच्या बैठकीत जमिनी वरील वन विभागाचा संपादन शेरा कमी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून यापुढे हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार आहे.केंद्राची देखील लवकरच मान्यता घेतली जाईल. याबाबत केंद्रीय वनमंत्री भूपेंद्रसिंह यादव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार सत्यजित देशमुख यांनी सांगितले. या निर्णयामुळे येथील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वन मंत्री गणेश नाईक यांचे आभार व्यक्त केले.
0 Comments