शिराळा :काळमवाडी(ता.वाळवा) येथील शंकर भाऊ देसाई यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या अवस्थेत अंदाजे दीड ते दोन वर्षाचा नर जातीचा बिबट्या विहिरीत आढळला. भक्ष्याच्या मागे पळताना तोल जाऊन तो विहिरीत पडला असल्याची शक्यता आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली.
याबाबत घटनास्थळ व वन विभागातून समजलेली माहिती अशी, शंकर भाऊ देसाई यांचा मुलगा दत्तात्रय हे सकाळी विद्युत मोटार सुरु करण्याकाठी विहीरीवर गेले होते. ती सुरु होत नसल्याने त्यांनी विहीरीत पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला. बिबट्याने मोटरची विद्युत केबल कट केली होती. याबाबत देसाई यांनी काळमवाडी चे पोलिस पाटील दिलीप वारे यांना माहीती कळविली. त्यांनी वनविभागास माहीती दिली. त्यानंतर शिराळ्याचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी बी बर्गे ,अनिल वाजे,वनरक्षक अश्विनी वाघमारे,भिवा कोळेकर ,हणमंत पाटील, दत्तात्रय शिंदे , कासेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, संताजी पाटील, आनंद देसाई, संग्राम कुंभार, प्राणीमित्र सुशीलकुमार गायकवाड, युनूस मणेर, संतोष कदम,अनिल पारधी, यांच्या पथकाने अथक परिश्रमाने बिबट्यास जीवनदान देण्यात आले. त्यास नैसर्गिक अधिवसात सोडण्यात येणार आहे.
0 Comments