शिराळा :कराड-मलकापूर राज्य महामार्गावर शिराळा तालुका अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी वेग नियंत्रक (स्पीड ब्रेकर) व तत्सम व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कराव्यात अन्यथा शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे दिला आहे.
नाईक पुढे म्हणाले, कराड- मलकापूर या राज्य मार्गाचे काम होऊन अनेक वर्षे झाले असून या रस्त्यावर आटुगडेवाडी ते कोकरूड (वारणा पुल) पर्यंतच्या मार्गावरती मोठ्या प्रमाणावर रहदारी वाढली आहे. विशेषतः गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर व कोकण परिसरामध्ये ये जा करणारी लहान मोठ्या तसेच अवजड वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणावर वाढली आहे. संबंधित रस्ता रुंद व चांगला असलेने त्यावरून जाणारी वाहने अतिशय वेगाने जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरती कोठेही गतिरोधक अथवा सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारे नियोजन न केल्यामुळे या महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे संख्येमध्ये वाढ होऊन निष्पाप लोकांचे बळी जाण्याचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसापूर्वी या ठिकाणी झालेल्या दोन भीषण अपघातामध्ये दोन व्यक्तींच्या मृत्यू झाला असून इतर नऊ जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. या रस्त्यावर गत दोन वर्षांमध्ये एकंदरीत ३९ अपघात झाले असून त्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. असंख्य लोक गंभीरित्या जखमी झाले आहेत.अपघातामध्ये पाच जनावरे देखील दगावली असून अनेक जखमी झाली आहेत. महामार्गावर वेग नियंत्रक बसविणेच्या मागणीसाठी यापूर्वी या राज्य मार्गावर असणाऱ्या ग्रामपंचायत व नागरिकांसह आम्ही २३ ऑगस्ट २०२४ रोजी रास्ता रोको आंदोलन पुकारले होते.
या अनुषंगाने ऑगस्ट २०२४ मध्ये शिराळा तहसील कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये एक महिन्यांमध्ये या राज्यमार्गावरील गतिरोधक स्पीड बेकर बसवून पांढरे पट्टे मारण्यात येईल असे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडून सांगण्यात आले. आम्ही सतत पाठपुरवठा करून संपर्क साधून देखील संबधितांकडून अद्याप या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. आमच्याकडून या कामाचा सतत पाठपुरावा करत असताना अधिकाऱ्यांच्याकडून लवकर काम सुरू करतो असे फक्त आश्वासन मिळात आहे. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे या मार्गावर असणाऱ्या गावांचे जनजीवन पूर्णपणे धोक्यात आले आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी केवळ सातत्याने पोकळ आश्वासने देऊन दुर्लक्ष केल्यामुळे आमच्यासमोर आता पुनश्च: आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
0 Comments