आष्टा: कुंडलवाडी (ता.वाळवा) येथील ईदच्या खरेदीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. पेठ सांगली महामार्गावर आष्टा येथे शिंदे मळ्या जवळ डंपर व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत एकाच कुटुंबातील दुचाकीवरील वडील व दोन मुलांचा जागेवर मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी आहे. जखमीवर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल ( ता.२६ )रोजी कुंडलवाडी येथील अश्पाक शब्बीर पटेल ( वय, ३९ ) हे पत्नी हसीना ( वय ३१) मुले अश्रफ ( वय ११ ) व असद ( वय ९) यांना घेऊन ईदच्या खरेदीसाठी मिरज येथे गेले होते. तेथे खरेदी करून कपडे खरेदीसाठी ते इस्लामपूरला निघाले असता, पेठ - सांगली महामार्गावर आष्टा येथील शिंदे मळ्याजवळ दुपारी चारच्या सुमारास त्यांची दुचाकी व समोरून येणाऱ्या डंपरची समोरासमोर धडक झाली. त्या धडकेत अश्पाक यांचा व त्यांची दोन मुले यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी हसीना गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली आहे.
अश्पाक हे उत्तम आचारी म्हणून प्रसिद्ध होते. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली.कुटुंबिय व नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा परिषद शाळेत तिसरी व पाचवीत मुले शिकत होती. मुलासह नातवंडाचा मृत्यू व सून गंभीर जखमी झाल्याने आई वडीलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
0 Comments