शिराळा,ता.२७ : मांगले (ता.शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून पती मंगेश चंद्रकांत कांबळे (३५ ) याने पत्नी प्राजक्ता मंगेश कांबळे (वय.२७) हिचा गळा आवळून खून केला. तो एवढ्यावर न थांबता त्याने तिचा मृतदेह जुना मोडक्या विद्युत पंपाच्या पेटीत घालुन ठेवला होता.ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मंगेश यांचे मुळगाव कोकरूड आहे. खून केल्यानंतर मंगेश कांबळे स्वतःहून पोलिसात हजर झाला. याबाबत मयत प्राजक्ताची आई रंजना अर्जुन चांदणे (वय ४५) रा. कोकरूड यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत शिराळा पोलीस ठाणे व घटनास्थळा वरुन मिळालेली अधिक माहिती अशी, मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहे. ते मांगले-वारणानगर रस्त्यावर जोतीबा मंदिराच्या समोर एका कौलारू घरात भाड्याने राहत आहेत. चार दिवसा पूर्वी २३ मार्च रोजी मंगेश पत्नी प्राजक्ता , मुलगा शिवम ,मुलगी मुलगी शिवन्या यांच्यासह मुंबईहून आई आणि भावाकडे रहायला आला होते. आई व भाऊ देववाडी येथे नातेवाईक यांच्याकडे दु:खद घटना घडल्याने गेले होते. सकाळी दहाच्या दरम्यान मंगेश व प्राजक्तामध्ये वाद झाला .तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून केला. मृतदेह बाजूच्या खोलीत घर मालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत घालून झाकून ठेवला . खोलीला बाहेरून कुलूप घालून भाऊ निलेश यांला फोन करून मी शिराळ्याला जाणार आहे. गाडी घेऊन ये असा निरोप दिला. त्यानंतर भाऊ निलेश देववाडीतून मांगलेत आल्यानंतर त्याने त्याच्याकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला. दरम्यान त्याचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता.
त्यावेळी निलेशने त्याला समजावून काय झाले विचारले असता त्याने मम्मी ,पप्पांचे दोघांचे भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर निलेशने मंगेश ला फोन करून कुठे आहेस असे विचारले,त्यावेळी त्याने मी शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिरा जवळ असल्याचे सांगितले. त्यानंतर निलेशने देववाडी येथील येथील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलवून घेतले. मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळच थांब आम्ही येतो म्हणून सांगितले. त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जावून सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्यांने खून केल्याचे सांगितले .त्यानंतर या तिघांनीही त्याला आम्हाला त्रास होईल तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असे सांगितले. त्यानंतर तो स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला. दरम्यान दुपारनंतर घटनेची माहिती मिळाल्यावर ज्योतिबा मंदिरा शेजारी वाघ यांच्या घरासमोर लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली. होती शिराळा पोलिसांनी प्राजक्ताच्या आईला व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली .पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक रितु खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी शिराळा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली.पुढील तपासाबाबत मार्गदर्शन केले.
दोन चिमुकले निराधार
आईच्या खुनामुळे वडीलांना पोलिसांनी अटक केल्याने त्यास शिक्षा होणार आहे.त्यामुळे सहा वर्षाचा शिवम व तीन वर्षाची शिवण्या ही दोन चिमुकली निराधार झाली आहेत.
प्रेम विवाह
प्राजक्ता व मंगेश यांचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह झाला आहे.प्राजक्ताचे लग्नापूर्वीचे नाव आरती होते. सध्या मंगेश मुंबई (पनवेल) येथे डंपर चालक म्हणून काम करत होता.
0 Comments