शिराळा,ता.९:निसर्गा पेक्षा माणसानी दिलेली दुःख जास्त आहेत.ते विसरण्याचे काम विनोद करत असतो.माणसं सुसंगतीला नव्हे तर विसंगितीला हसतात.अपेक्षा भंग हा विनोदाचा आत्मा असतो.मानवी जीवनातील दुःख निराशा विसरायला लावण्याचे काम विनोद करत असतो. त्यामुळे दुःखाकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याचा मार्ग म्हणजे विनोद असल्याचे प्रतिपादन ग्रामीण विनोदी कथाकार प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी केले.
पणुंब्रे वारूण (ता.शिराळा)येथे शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पणुंब्रे वारुण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या डोंगरी साहित्य संमेलनातील कथाकथन सत्रात बोलतं होते.
यावेळी प्रा .विश्वनाथ गायकवाड पुढे म्हणाले की,कथा माणसाला आपल्या विवंचणे पासून दूर घेऊन जाते आणि विनोदी कथा माणसाला खळखळून हसवते. खळखळून हसणे हे जसे निरोगी पणाचे लक्षण आहे तसेच निरोगी मनाचे पण लक्षण आहे. म्हणून माणसाने कधीतरी खळखळून हसावे. पोट धरून हसावे आणि पोट भरूनही हसावे. विनोदी कथा माणसाचे दुःख संपवत नसली तरी काहीकाळ दुःख विसरायचे काम करते. म्हणून विनोदाला मानवी जीवनात महत्वाचे स्थान असल्याचे असे सांगून त्यांनी विनोद निर्मिती मागचे अनेक किस्से सांगून खळखळून हसवले. यानंतर त्यांनी "गेले ते दिवस "ही ग्रामीण विनोदी कथा आपल्याला ढंगदार शैलीत सादर करत उपस्थित साहित्य रसिकांना पोटधरून हसायला लावले . प्रारंभी स्वागताध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले .परिषदेचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी आभार मानले.
0 Comments