शिराळा,ता.१०:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाच्या निमित्ताने शिराळा भुईकोट किल्ला येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य रांगोळीचे नियोजन करण्यात आले असून आज मंगळवार दिनांक ११ मार्च रोजी लोकांना ७ हजार स्कवेअर फुटाची भव्य रांगोळी पाहण्यासाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार देशमुख म्हणाले,शिराळा येथील भुईकोट किल्लास ऐतिहासिक महत्त्व आहे.याच ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न झाला. संगमेश्वरनायरी वरून मार्ग बदलून शिराळा भुईकोट किल्ला येथे आणल्याची माहिती मावळ्यांना समजताच हजारो मावळे आपल्या राजांना सोडवण्यासाठी शिराळा व शिराळा पंचक्रोशितील अनेक मावळ्यांनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले आहे.छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबर ज्योत्याजी केसरकर,सरदार तुळाजी देशमुख,आप्पा शास्त्री दीक्षित,हरबा वडार आणि सर्वच मावळे धारातीर्थी पडले.शिराळ्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावरती भव्य दिव्य रांगोळी रेखाटण्यात येत आहे.
पहिल्यांदाच ७ हजार स्कवेअर फुटाची ही भव्य रांगोळी रेखाटण्यात आली आहे.निनाईदेवी शिक्षण संस्थेच्या सचिवा ॲड.रेणुकादेवी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.ही रांगोळी डोंगरी भागात राहणाऱ्या शिराळा तालुक्यातील कांदे येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार सुनील कुंभार यांनी रेखाटली आहे.आज मंगळवार दिनांक ११ मार्च पासून ही रांगोळी पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहे.
0 Comments