शिराळा:महाराष्ट्र शासनाच्या यशवंत पंचायतराज अभियानाचा विभागस्तरीय निकाल जाहीर झाला असून यामध्ये पुणे विभागातून शिराळा पंचायत समितीचा दुसरा क्रमांक आला. प्रथम क्रमांकावर विटा (खानापूर) तर तृतीय क्रमांकावर खंडाळा पंचायत समिती राहिली आहे.
महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत समितीच्या कामकाजाचे मूल्यमापन होते. आर्थिक वर्षातील आरोग्य, शिक्षण, कृषी, नरेगा, घरकुल, बांधकाम, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण अशा सर्व विभागाच्या कामकाजाचे मूल्यमापन या अभियानांतर्गत केले जाते. पंचायत समिती शिराळा मागील चार वर्षापासून सातत्याने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. सन २०२२-२३ या मूल्यमापन वर्षात शिराळा पंचायत समितीचा पुणे विभागात प्रथम क्रमांक आला होता. राज्यस्तरीय स्पर्धेत पंचायत समितीची तपासणी झालेली आहे. यावर्षीचा अंतिम निकाल लागणे बाकी असले तरी सन२०२३-२४ या मूल्यमापन वर्षाची तपासणी झाल्यानंतर पुणे विभागात शिराळा पंचायत समितीने दुसरा क्रमांक पटकावून तालुक्याचे नाव उज्वल केले. यामध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तत्कालीन गटविकास अधिकारी संतोष राऊत, सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, पंचायत समितीचे सर्व कार्यालय प्रमुख व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन पंचायत समितीला नावलौकिक मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल आमदार सत्यजित देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी पंचायत समितीचे अभिनंदन केले आहे.
यशवंत पंचायतराज अभियानात शिराळा पंचायत समिती सातत्याने प्रगती करत असून पुढील वर्षी राज्यात प्रथम क्रमांक आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने सर्व विभागांची वाटचाल सुरू असून पदाधिकारी व अधिकारी यांच्या मदतीने शिराळा पंचायत समितीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.
प्रकाश पोळ गटविकास अधिकारी शिराळा
नंबराची हॅट्रिक:
गत वर्षी यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारामध्ये सन २०२२-२३ साठी शिराळा पंचायत समितीने पुणे विभागात प्रथम क्रमांक तर दोन वर्षा पूर्वी तृतीय क्रमांक पटकावला होता. यावर्षी दुसरा क्रमांक पटकावला आहे. सलग तीन वर्षे शिराळा पंचायत समितीला यशवंत पंचायतराज मध्ये नंबर मिळत असल्याने पंचायत समितीची नंबराची हॅट्रिक झाली आहे.
0 Comments