शिराळा : ता. ८: कुरळप (ता.शिराळा) येथील इंदुमती राजाराम पाटील (वय ७०) या वृद्धेचा हात-पाय, तोंड कपड्याने बांधून व विळ्याने वार करून खून करण्यात आला. या बाबत मारुती राजाराम पाटील यांनी कुरळप पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध कुरळप पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.इंदुमती पाटील त्यांच्या घरी एकट्याच राहत होत्या. यापूर्वी इतरांच्या शेतात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या.आता वय वाढल्याने एक, दोन शेळ्या पाळून त्यावर त्या आपली उपजीविका चालवत होत्या. गुरुवारी (ता. ७) दुपारी घरातून शेळ्यांना चारा आणण्यासाठी ऐतवडे खुर्द-कुरळप (चांदोली वसाहत) पवार वस्तीलगतच्या इतरांच्या शेतात गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न आल्याने गावातील त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्या सापडल्या नाहीत. दरम्यान, त्यांच्या अंगावरचे छोटेसे कापड उसाच्या फडात सापडल्यानंतर नातेवाइकांनी सकाळी पवार वस्तीनजीक पुन्हा त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी मुख्य रस्त्यापासून आत दोनशे मीटरवर उसाच्या फडात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचे दोन्ही हात व तोंड कापडाने आवळून बांधले होते. पोटात विळ्याचा खोलवर वार केलेला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. श्वानाला पाचारण करण्यात आले. पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील करत आहेत.
0 Comments