BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दिव्यांग तरुणाचा खून Murder of disabled youth in Belanki



मिरज :बेळंकी  येथे जानराववाडी रस्त्यावर उमेश पांडुरंग कांबळे (वय ४४, रा. बेळंकी) या दिव्यांग तरुणाचा डोक्यात वर्मी घाव घालून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.  खुनाचा हा प्रकार शनिवारी रात्रीच्या सुमारास झाला असण्याची शक्यता आहे. या घटनेची मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. सलग तिसऱ्या  दिवशी खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (ता. ८) कुरळप येथील इंदूमती पाटील या सत्तरवर्षीय वृद्धेचा हात-पाय, तोंड कपड्याने बांधून व विळ्याने वार करून खून करण्यात आला. शनिवारी  (ता. ९) मिरजेतील पंढरपूर रस्त्यावर एका मंदिराजवळ भाजप नेते सुधाकर खाडे यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच काल रविवारी  (ता. १०) मिरज तालुक्यातील बेळंकी येथे खुनाची घटना उघडकीस आली. एकामागून एक खुनाचे हे सत्र सुरू असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बेळंकी जानराववाडी रस्त्यावर रेल्वे पुलाच्या पश्चिम बाजूला रस्त्याकडेला असलेल्या खड्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दिसला. त्यांनी याबाबत गावात माहिती दिली. पोलिसपाटील चंद्रकांत पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, हा मृतदेह उमेशचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांना कळविले. पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी करत पंचनामा केला. उमेश याच्यावर शनिवारी रात्रीच्या सुमारास धारदार हत्यार अथवा दगडाने वार केला असण्याची शक्यता आहे. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.पोलीस पथकाने पंचनामा केला. सुरुवातीला अज्ञात वाहनाच्या धडकेत उमेशचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.मात्र, त्याच्या डोक्यात वर्मी घाव आढळल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


Post a Comment

0 Comments