शिराळा :शिराळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक विरुद्ध सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांची एकास एक काटा लढत सुरू आहे. त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी त्यांच्या मुलींनी पायाला भिंगरी बांधून मतदारांच्या घराघरात पोहचून माझे बाबा या निवडणुकीत का उभे राहिले असून त्यांनाच का निवडणून द्याचे ही आपली भूमिका पटवून देवू लागल्या आहेत. महिला असल्यामुळे त्या बिनधास्तपणे थेट स्वयपाकघरात जाऊन महिलांच्या मनात आपली भूमिका बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत.घराघरात जाऊन बाबांच्या प्रचारासाठी मुलींनी राबवलेला हा "किचन प्रचार" सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
आमदार मानसिंगराव नाईक यांच्या शर्मिला लाड,मोनालीसा शिंदे,डॉ.पल्लवी पाचपुते या तिघींमुली तर सत्यजित देशमुख यांची कन्या साईतेजस्वी ही शिक्षणासाठी अमेरिकेत होती. तिने हि सुट्टी काढून आपल्या वडिलांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या तिन्ही मुलींनी मानसिंगराव नाईक यांनी २००९ ते २०१४ ला ५१७ तर २०१९ ते २०२४ ला या मतदार संघासाठी २२७५ कोटींची आणलेली विविध विकास कामे तर सत्यजित देशमुख यांच्या प्रचारात त्यांची एकुलती एक असणारी साईतेजस्वीने आपले आजोबा स्व.शिवाजीराव देशमुख यांनी केलेली विकास कामे व महायुतीच्या माध्यमातून आलेल्या विविध योजना मतदारांच्या पर्यंत पोहचवण्याची धडपड सुरु केली आहे. प्रचाराला अवधे चार दिवस राहिले आहे. त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवून गल्लोगल्ली घराघरात जाऊन आपले चिन्ह व नेत्यांची भूमिका पोहचवण्याचे काम सुरु केले आहे. दिवसभर मतदार शेतात असल्याने जे शेतात भेटतील त्यांची शेतात भेट घेतली जाते ,जे भेटत नाहीत त्यांची रात्री घरी जाऊन भेट घेवून आपली भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. उमेदवारांच्या मुलीनी प्रत्यक्ष सभेवर भर न देता वैयक्तिक गाठी भेटीवर भर दिला आहे. त्यामुळे कन्यांचा "किचन प्रचार" धुमधडाक्यात सुरु आहे.
0 Comments