कुरळप : चिकुर्डे (ता. वाळवा) येथे विवाहिता कविता उत्तम बुरसे-पाटील (वय ४२) यांचा घरगुती वादातून पतीने डोक्यात दगड घालून खून केला. घटनेनंतर संशयित पती उत्तम हणमंत बुरसे-पाटील (५२) हा स्वतः पोलिसांत हजर झाला.याबाबत नीतेश श्रीकांत बुरसे-पाटील यांनी कुरळप पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून उत्तमवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.एका आठवड्यात जिल्ह्यात चौथी घटना तर वाळवा तालुक्यातील दुसरी घटना असल्याने खळबळ उडाली आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, करंजवडेतील कविताचा चोवीस वर्षांपूर्वी चिकुर्डे गावातील उत्तम बुरसे-पाटील याच्याशी विवाह झाला होता. घरात वारंवार वाद होत असल्याने कविता चार महिन्यांपूर्वी माहेरी करंजवडे या गावी राहायला गेल्या होत्या. मात्र पती उत्तम याने, 'तू परत ये, अन्यथा मी माझ्या जीवाचे काहीतरी करून घेईन,' अशी धमकी दिल्याने त्या नवरात्रोत्सवाच्या दरम्यान दोन महिन्यांपूर्वी सासरी आल्या होत्या. परवा सायंकाळी गावात प्रचार करून उत्तम रात्री उशिरा घरी आला. त्यावेळी त्याचे आणि पत्नीचे घरगुती कारणावरून भांडण झाले. त्यानंतर दोघेही झोपी गेले. पहाटे पाचच्या सुमारास त्याने घराबाहेरील मोठा दगड आणून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात घातला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अंघोळ करून शेजारी असलेल्या भावकीतील लोकांना, बायकोच्या डोक्यात दगड घातल्याचे सांगून कुरळप पोलिसांत हजर झाला. कुरळप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक सुनील माने, कुरळप ठाण्याचे पोलिस राजेंद्र जाधव, दीपक खोमणे व फॉरेन्सिक लॅबचे पथक अधिक तपास करत आहे.त्यांना दोन मुल आहेत. मुलगा पदवीच्या शेवटच्या वर्षात, तर मुलगी डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहेत.
चौकट-
शुक्रवारी (ता. ८) कुरळप येथील इंदूमती पाटील या सत्तरवर्षीय वृद्धेचा हात-पाय, तोंड कपड्याने बांधून व विळ्याने वार करून खून करण्यात आला. शनिवारी (ता. ९) मिरजेतील पंढरपूर रस्त्यावर एका मंदिराजवळ भाजप नेते सुधाकर खाडे यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. रविवारी (ता. १०) मिरज तालुक्यातील बेळंकी येथील उमेश पांडुरंग कांबळे (वय ४४,) या दिव्यांग तरुणाचा डोक्यात वर्मी घाव घालून अज्ञाताने खुन केला होता. काल मंगळवारी (ता.१२ )चिकुर्डे (ता. वाळवा) येथे विवाहिता कविता उत्तम बुरसे-पाटील (वय ४२) यांचा घरगुती वादातून पतीने डोक्यात दगड घालून खून केला.
0 Comments