शिराळा,ता.२३ :अल्प शिक्षित असणाऱ्या माझ्या आईने मला नेहमीच शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.माझ्या शिक्षणासाठी तिने रात्रंदिवस काबाडकष्ट केले. तीच्या स्मृती कायम जपण्यासाठी कर्णबधिर विद्यार्थ्यांना तीच्या स्मृतीतून मायेची उब मिळावी म्हणून चादर भेट देण्याचा कुटुंबीयांनी निर्णय घेतला.आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्येकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत या मुलांना मदत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आयसीआयसीआय बँकइचलकरंजी शाखेचे विभागीय अधिकारी प्रतिक पाटील यांनी केले.
शिराळा येथे बधीरमुक विद्यालयात मुलांना आईच्या द्वितीय स्मृतीदिनाचे औचित्य साधून इतर खर्चाला फाटा देत चादर भेट प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रेस क्लब ऑफ शिराळा चे कार्याध्यक्ष दिनेश हसबनीस,शिराळा तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चौगुले ,उद्योजक सचिन मिरजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पाटील म्हणाले, ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील कर्ण बधिर मुला मुलींना स्वावलंबी करण्यासाठी झटणार्या सर्व कर्मचारी आणि शिक्षकांचे कौतुक आहे. दिव्यांगांना समाजात स्वाभिमान मिळवून देणाऱ्या संस्थेच्या पाठीशी समाज्यातील प्रत्येक घटकाने रहायला हवे.
मिरजकर म्हणाले,आपण जे कमवतो त्यामधील काही हिस्सा समाजासाठी वापरणे गरजेचे आहे.तेच काम प्रतिक पाटील यांनी केले आहे.समाजातील प्रत्येक घटकाने असा पुढाकर घेवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याची गरज आहे.
स्वागत अमित भराडे यांनी केले.प्रास्ताविक मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांनी केले. यावेळी अनिल कुलकर्णी,अनघा जोशी,सारिका शिंदे,संदीप राठोड, रोहित कांबळे,विठ्ठल पुजारी,किरण भोई,सुरज भोरे उपस्थित होते. आभार अमोल तेली यांनी मानले.
0 Comments