श्रावण महिना नुकताच संपला असून सध्या ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. सर्वत्र डोंगर,दऱ्या खोऱ्या ,पठार ,शेत शिवार हिरवाईने नटलेले आहे.शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी व शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठारावर फुलांचा बहार सुरु झाला आहे. त्यामुळे शाहुवाडी व शिराळा तालुक्यात पावसाळी पर्यटन वाढू लागले आहे. अनेक शैक्षणिक सहली या पठाराल भेट देवू लागल्या आहे.
शैक्षणिक सहल म्हटलं की मुलांचा आनंद द्विगणित होतो.अशीच मुलांच्या आनंदात भर घालणारी पलूस तालुक्यातील ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंदनगरच्या शैक्षणिक सहलीने चांदोली परिसरात भेट दिली . मुलांनी आनंदी उत्साही वातावरणात अभ्यास दौरा म्हणून वारणा धरण ,वसंत सागर जलाशय, चांदोली राष्ट्रीय उद्यान, उदगिरी पठारावर फुलणारी विविध फुले यांची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. भौगोलिक, ऐतिहासिक ठिकाणाला भेटी देवून निसर्गरम्य परिसरातून अभ्यासासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी सांस्कृतिक विभाग प्रमुख अमोल जाधव यांच्या कडून व चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे गाईड सोमनाथ पाटील यांच्या कडून समजून घेतल्या.सध्या पावसाळा सुरु असल्याने चांदोली राष्ट्रीय उद्यान व वारणा धरण पावसाळ्यामुळे बंद आहे असल्याने धरणावर व उद्यानात जाता येत नाही. त्यामुळे मणदूर-खुंदलापूर मार्गावर घाट रस्त्यावरून तीन ठिकाणी दुरून वारणा धरणाचा परिसर व जलाशय पाहता येतो.जाधववाडी येथील वन्यजीव विभागाच्या नाक्यावर चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार आहे. त्या ठिकाणी बिबट्या,गवे,वाघ,रान डुकर ,हरीण,सांबर,मोर, माकड अशा विविध प्राणी,पशु ,पक्षी यांच्या प्रतिकृती उभारल्या आहेत. त्यामुळे काही क्षण आपण उद्यानात फिरत असल्याचा भास पर्यटकांना होतो. त्या ठिकाणी सेल्फी काढून पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटतात.जवळच असलेल्या रिसॉर्टला भेटी देवून त्या ठिकाणी उभारलेल्या विविध कलाकृती पाहून पर्यटक आनंदी होतात. शहरी भागातील मुलांना या परिसरात असलेले ग्रामीण जीवन अनुभवता येत आहे.या ठिकाणी असणारी कौलारू घरे ,लोकांचे जनजीवन जवळून पाहायला मिळते. पावसाच्या रिमझिम सरीत भिजण्याचा आनंद लुटता येतो. गाईड म्हणून असणाऱ्या सोमनाथ पाटील याची आवाजाचा बादशहा म्हणून ओळख आहे.ते उत्तम गाईडची म्हणून भूमिका निभावत असताना येणाऱ्या पर्यटकांना परिसराची सविस्तर माहिती देत असताना विविध पशुपक्ष्यांच्या व दिग्गज राजकीय नेते व अभिनेत्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध करून सोडतात . त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा आनंद द्विगुणीत होतो. उदगिरी व गुढे पाचगणी पठारावर विविध रंगी फुलांचा बहार सुरु झाला आहे.त्यामुळे त्याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत.
चांदोली परिसराने धारण केलेला हिरवाईच्या शालु,निसर्गाची मुक्त हस्त असणारी उधळण पाहून आम्हाला खूप आनंद झाला. विविध प्रकारची रंगी बेरंगी फुलं पाहून मन प्रसन्न झाले. अधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत फिरताना आम्हाला खूप मजा आली.
सिध्दी हवलदार (विद्यार्थिनी)
शहरी भागात राहणाऱ्या मुलांना ग्रामीण भागातील राहणीमान, कौलारू घरे, लोकसंस्कृती जीवन जवळून न्याहाळता आली. शैक्षणिक सहलीतून शैक्षणिक दृष्ट्या आम्हास मिळालेले हे अनुभव कधीही न विसरण्या सारखे आहे.विद्यार्थ्यांसाठी उत्तम सहली बरोबर एक अभ्यास दौराच होता.
साहेबराव पावरा (शिक्षक)
0 Comments