शिराळा ,ता.४: जंगलातील बिबटे शेतात आणि आता शेतातील बिबटे गावात आल्याने शिराळकारांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिराळा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने उसात लपलेल्या बिबट्याला आता सहज खाद्य मिळू लागले आहे.त्यामुळे शेतात दिसणाऱ्या बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे.
काल मंगळवारी रात्री शिराळच्या घुमट स्मशानभूमी येथील लोकवस्ती मध्ये अतुल नलवडे यांच्या घराजवळ बिबट्या दिसला. त्यावेळी युवकांनी त्याचे चित्रीकरण केले.ते समाज माध्यमावर आल्याने लोक सतर्क झाले. दोन दिवसांपूर्वी शिराळा येथील कोकरूड रस्त्यावरील पेट्रोल पंप, सुगंधा नगर मधून एसटी कॉलनी व भुईकोट किल्यां पर्यंत बिबट्याचे दर्शन झाले . त्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.शिराळा बाह्य वळण रस्त्यावर गोरक्षनाथ मंदिर , कोकरुड रोड विसावा धाबा येथे सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाला आहे.याबाबत माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली हणमंत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. पाडळेवाडी येथील वैभव आदीक नायकवाडी यांच्या शेतातील वस्तीवरील बोकडाला बिबट्याने हल्ला करून ठार मारले. यापूर्वी उसात बिबट्याचे दर्शन होत होते.मात्र आता नागरीवस्तीत वावर वाढल्याने लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सध्या शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील चौकाचौकात भटक्या कुत्र्यांचे कळप असून हे बिबट्यांचे मुख्य भक्षच बनू लागले आहे. बिबट्यास सहज खाद्य मिळत असल्याने त्यांनी आपला मोर्चा नागरीवस्तीत वळवला आहे.
कोट- दोन महिन्यात बिबट्याचे ५ वेळा दर्शन
घुमटवस्ती येथे दोन महिन्यात ५ वेळा बिबट्याचे दर्शन झाले आहे.दोन कुत्री ठार केली आहेत.रात्री याच परिसरात नागरिकांना बिबट्या दिसला आहे.त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा .
अतुल नलवडे (नागरिक )
0 Comments