शिराळा,ता.७ :शिराळा तालुक्यातील ओढे,वारणा,मोरणा नदीकाठी आलेला महापुर आणि अतिवृष्टीमुळे घरची झालेली पडझड,शेती,रस्ते , वीज वितरण कंपनी यांचे सुमारे सहा कोटी रुपयाहून अधिक नुकसान झाले आहे. महापुराने नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी १४.५० कोटी रुपयांच्या पुल,संरक्षक भिंत, रस्ते याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविण्यात आला आहे.
जुलै महिन्यात सलग अतिवृष्टी झाल्याने मणदूर ,सोनवडे,करुंगली,मराठवाडी काळुंद्रे,चरण,मोहरे,नाठवडे, खुजगांव, मोरेवाडी,चिंचोली, कोकरूड,फुफिरे,शिराळे खुर्द,पुनवत कणदूर,ढोलेवाडी सागाव, नाटोली ,कांदे,मांगले,देववाडी गावापर्यंतच्या नदीकाठची पिके पाण्याखाली गेल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे.३१ बाधीत गावातील ६७७६ शेतक-यांचे १९६२ बाधीत क्षेत्राचे पंचनामे कृषी विभाग तलाठी कृषी सहाय्यक ,ग्रामसेवक यांनी केले आहे. यासाठी ३कोटी ३० लाख ४३ हजार रुपयांची नुकसान भरपाई साठी मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे ५९३ घरांची पडझड झाली आहे. यामध्ये ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नदी काठचे व शेतातील पडलेले विजेचे खांब ,रोहित्र , उच्च व कमी दाबाच्या वीज वाहिनी ,पाईप, केबल, यांचे तीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ते , पुल आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांची तात्पुरती दुरुस्तीसाठी १.४७ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मणदूर पूल,कुसाईवाडी संरक्षक भिंत आदी कायमस्वरूपी पुरा पासून सरक्षण व्हावे यासाठी १४.५० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तालुक्यातील २१५६ शेतकर्यांच्या ३९० हेक्टर भात पिकांचे तर १६१९ हेक्टर उस पिकाचे नुकसान झाले आहे. सोयाबीन ३० हेक्टर, भुईमूग ११५ हेक्टर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत .
दोन महिन्यात २३ वेळा अतिवृष्टी
चांदोली परिसरात जुलै महिन्यात १७ वेळा तर चरण येथे ११ आणि ऑगस्ट महिन्यात चांदोलीत ६ तर चरण येथे २ अशी दोन महिन्यात चांदोलीत २३ वेळा व चरण येथे १३ वेळा अतिवृष्टी झाली आहे.
१३ दिवस स्थलांतर
२६ जुलै पासून २० गावतील १५ रस्ते , ११ पूल पाण्याखाली गेले होते.५२ कुटुंबातील २४४ लोकांना व १८८५ जनावरांना सुरक्षित ठिकाणी सुमारे १३ दिवस सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले होते.
0 Comments