इस्लामपूर : इस्लामपूर येथील सद्गुरु आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेतला. शाळेत जी.एस. आणि एल. आर.पदासाठी निवडणूका झाल्या. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल ॲपचा वापर करून प्रत्यक्ष बॅलेट आणि कंट्रोल युनिट ची निर्मिती करण्यात आली होती. झोनल अधिकारी, केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी,पोलीस स्वयंसेवक अशा विविध भूमिकेत विद्यार्थी होते. अत्यंत नियोजनबद्ध आणि हुबेहूब प्रत्यक्ष निवडणुकीप्रमाणे या निवडणुका झाल्या.
गेल्या आठ दिवसापासून या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होता. उमेदवारी अर्ज भरणे माघारी घेणे,चिन्हांचे वाटप, प्रचार अशी सर्वच प्रक्रिया यावेळी राबविण्यात आली. यामुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. त्यामुळे सर्वच विद्यार्थी आनंदी होते. पोलीस झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्या बंदोबस्तात संध्याकाळी निकाल जाहीर झाला. निकालानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
महसूलचे राजू कदम, पुरवठा निरीक्षक शिवाजी लांडे, विस्तार अधिकारी छाया माळी, केंद्रप्रमुख पोपटराव जाधव, सद्गुरु जंगली महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव एकनाथराव जाधव,सहसचिव सत्यजित जाधव, संचालक रणजीत जाधव, पत्रकार विनोद मोहिते तसेच पालक व परिसरातील नागरिकांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
मुख्याध्यापक सचिन पाटील, ए.सी. आत्तार यांचे मार्गदर्शनाखाली विक्रम निकम, संजय धुमाळ,वैभव मुळे, शुभम जाधव, ऋषिकेश गायकवाड यांचेसह शिक्षकांनी संयोजन केले.
शालेय जीवनातच मतदानाचा अनुभव देण्याचा शाळेने केलेला प्रयत्न उल्लेखनीय आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात कसा करता येतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. शाळा राबवत असलेले उपक्रम विद्यार्थी तसेच समाजाला दिशा देणारे आहेत.
छाया माळी (विस्तार अधिकारी पंचायत समिती इस्लामपूर)
मोबाईल ॲपचा वापर करून असे प्रत्यक्ष मतदान घेता येते याची प्रचिती आजचा उपक्रम पाहिल्यानंतर आली. हा उपक्रम पाहिल्यानंतर आम्हाला एक वेगळं ज्ञान मिळालं. प्रत्यक्ष निवडणुक काळात आणि मतदान केंद्रावर जे वातावरण असते ते वातावरण शाळेत पाहायला मिळालं. मतदान अधिकारी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपली कर्तव्य माहीत होती याच कौतुक वाटलं. शाळेचा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे.
शिवाजी लांडे (पुरवठा निरीक्षक)
0 Comments