शिराळा,ता.३०:विश्वास कारखान्यामार्फत पहिल्या टप्प्यात रिळे व दुसऱ्या टप्प्यात चिखली येथे सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. अडचणीच्या काळात मदत म्हणून शेतकऱ्यांना उभ्या उसावर एकरी २० हजार रुपये कर्ज देण्या बरोबर सभासदांना ज्यादा साखर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे प्रतिपादन विश्वास कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता.शिराळा) येथे विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक,कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील,रणधीर नाईक,विराज नाईक ,माजी कार्यकारी संचालक बाबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थितीती होती.यावेळी नाईक म्हणाले, यावर्षी आलेल्या पुरात नदी काठची पिके कुजली आहेत. पाऊस पडला आणी नाही पडला तरी शेतकऱ्याचे नुकसान होतेच .त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.इथेनॉलसाठी कारखान्याने १०० कोटी गुंतवले असताना गेल्या वर्षी इथेनॉलवर सरकारने बंदी घाल्याने सभासदांच्या डोक्यावर १० कोटीच्या व्याजाचा भुर्दंड बसला आहे. केंद्र सरकारच्या एका चुकीच्या निर्णयाने विश्वास कारखान्याच्या सभासदांना १० कोटीचा भुर्दंड बसत असेल तर त्यावर टीका करायची नाही का ? मी टीका केल्याने सत्यजित देशमुख म्हणतात सरकार भाजपचे असून मी सरकारवर टीका करतोय. मात्र आम्हाला एन.सी.डी.सी.चे कर्ज चालतंय. पण त्यांना हे माहित असायला हवे की एन.सी.डी.सी.ही भाजपची बँक नाही. पन्नास वर्षे सत्ता असताना काँग्रेसच्या कोणत्या हि नेत्याने कधी ही आपली बँक असल्याचा दावा केला नाही..या बँकेकडून विश्वास कारखाना प्रत्येकवर्षी कर्ज घेवून नियमित परतफेड करतोय. त्या ठिकाणी कारखान्याची 'अ' श्रेणी आहे.
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, गावापासून राज्यापर्यंत आपल्या विचारांचा व विकासासाठी झटणारा कणखर माणूस पाहिजे.विकास कामात शिराळा तालुका अग्रेसर आहेच .एकत्रित ताकद पणाला लावली तर विकास होऊन संघटित ताकदीने आपले प्रश्न सुटतील.कारखान्याचे अध्यक्ष म्हणून मानसिंगराव नाईक यांनी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली असून आमदार म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील इतर आमदारांच्या तुलनेत जास्त निधी आपल्या मतदारसंघात आणला आहे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संचालक विराज नाईक यांनी केले. श्रद्धांजली वाचन संचालक शिवाजी पाटील तर नोटीस वाचन कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी केले. रणजितसिंह नाईक,बापुसो नकील,शामराव पाटील,उमाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व ठराव एक मताने मंजूर केले. नदी बुड क्षेत्रातील पिकांची शासनानाने नुकसान भरपाई द्यावी असा ठराव सर्वानुमते करण्यात आला.
यावेळी अमरसिंह नाईक,राजेंद्रसिंग नाईक,सम्राटसिंग नाईक,सौ.सुनीतादेवी नाईक,डॉ.शिमोनी नाईक, कार्यकारी संचालक अमोल पाटील, संचालक दिनकरराव पाटील,विश्वास कदम,सुहास पाटील कोंडीबा चौगुले उपस्थित होते.आभार हंबीरराव पाटील यांनी मानले.
0 Comments