शिराळा,ता.२८: राज्याच्या हिताचे काम कसे करावे हे शिवाजीराव देशमुख यांच्या कडून शिकलो.शिराळ्याला चांगला राजकीय वारसा आहे. अनेक दिग्गज असल्याने येथे महायुतीचे कमळ फुलल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी केले.
शिराळा येथे रसिका हॉल येथे भारतीय जनता पार्टी पदाधिकारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी आमदार सदाभाऊ खोत, भाजपा नेते जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सत्यजित देशमुख, सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष निशिकांत पाटील,भाजपा नेते सम्राट महाडिक,सी.बी. पाटील, संपतराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विनोद तावडे म्हणाले, शिराळा मतदारसंघात येत असताना स्व.देशमुख साहेब यांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. राज्याचा हितासाठी कसे काम करावे हे त्यांनी पहिल्यापासून दाखवून दिले आहे. आता शिराळा तालुक्यात अनेक कमल फुलल्याचे समाधान आहे. गृहमंत्री असताना भिवंडीच्या दंगलीत शिवाजीराव देशमुख यांनी स्वतः उतरून ती परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली होती. त्यांच्या कामाचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते.या मतदारसंघाची सर्व पार्श्वभूमी मी जाणून घेतली त्यामुळे विरोधकांचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही. मराठा आरक्षण हे निव्वळ शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यामुळे सुप्रीम कोर्टात फेटाळले गेले. मराठा आरक्षण घालविण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केली आहे. याउलट भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिले. हायकोर्टात ते टिकवून देखील दाखवले.
सत्यजित देशमुख म्हणाले, या मतदारसंघात भाजपाचे काम चांगले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली सर्व कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करा. लोक निश्चितपणे आपल्याला स्विकारतील. येथील आमदारांनी केंद्र सरकारचे धोरण साखर कारखानदारीला पोषक नाही.म्हणून टीका करायची आणि दुसरीकडे त्याच केंद्र सरकारकडून एनसीडीसीच्या माध्यमातून सरकारच्या मदतीने कारखान्याला कर्ज घ्यायचे. हा दुटप्पीपणा त्यांनी सोडावा.
सम्राट महाडिक म्हणाले, या मतदारसंघात बुथरचना,शक्ती केंद्रप्रमुख मजबूत आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपला मिळावा. विद्यमान आमदारांनी दबावाचा वापर करून लोकांना त्रास देण्याचे काम केले आहे. राज्य सरकारकडून भरपूर निधी मिळवला आहे.आणि भाजपाच्या विरोधातच कटकारस्थान रचले आहे.
स्वागत हणमंतराव पाटील यांनी तर प्रस्ताविक डॉ. सचिन पाटील यांनी केले.यावेळी के.डी .पाटील, रणजीतसिंह नाईक,पैलवान अशोक पाटील,पैलवान जयकर कदम,सम्राट शिंदे,केदार नलवडे,जगन्नाथ माळी, तानाजी कुंभार,भिमराव पाटील,सर्जेराव पाटील,शेखर भोसले,विद्याताई पाटील, उपस्थित होते.
0 Comments