शिराळा ,ता.२८:शिराळा तालुक्यातील एका गावातील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी २६ वर्षीय युवक व त्यास पळून जाण्यास मदत करणाऱ्या एकास शिराळा पोलिसांनी अटक केली आहे.बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिराळा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अत्याचार करणाऱ्या युवकास शिराळा न्यायाल्याने २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मुलीच्या वडिलांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी १७ जुलै रोजी अल्पवयीन मुलीचे वडील शेतात गेले होते.संध्याकाळी घरी आले असता मुलगी घरात नसल्याचे लक्षात आले.त्यांनी शोधाशोध केली; मात्र ती मिळाली नाही.याबाबत शिराळा पोलिसांनी शोध घेतला असता तपासात गावात राहणाऱ्या एका युवकाचे नाव निष्पन्न झाले.यावेळी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पाटील,नितीन यादव,शरद पाटील,विकास शिंदे यांनी तपास करून संशयित हा पेण (जि.रायगड) येथील त्याच्या मित्राच्या बहिणीच्या घरी रहात असल्याची माहिती मिळाली.यावरून त्यांना पोलिसांनी पेण येथून अटक केली.यावेळी सदर मुलगी व युवक या दोघांना मोटारसायकलवरून कोकरूड येथे गाडीत बसविण्यासाठी एक मित्र गेला होता.मात्र तिथे गाडी न मिळाल्याने त्याने त्यांना कराड पर्यंत नेऊन सोडले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.त्यामुळे पोलिसांनी पळून जाण्यास मदत करणाऱ्यास अटक केली.या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अत्याचार करणारा युवक त्या मुलीच्या गावात कामा निमित्ताने राहण्यास होता.त्यातून त्यांची ओळख झाली होती.पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करत आहेत.
0 Comments