शिराळा, ता. २४: अंत्री बुद्रूक (ता. शिराळा) येथील निवास नामदेव पाटील (वय २२) हा युवक पायावर घराचे छत व वासा पडून गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये त्याचे दोन्ही पाय मोडले आहे. हाताला व चेहऱ्याला दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, शिराळा तालुक्यात गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घराची पडझाड सुरु आहे. काल मंगळवारी पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे निवास घरी होता. अचानक घराचे छत कोसळले. त्यामुळे वासा अंगावर पडून त्याच्या पायाला व हातातला लागले. त्यामध्ये दोन्ही पाय मोडले असून हाताला व चेहऱ्याला लागले आहे. त्याच्यावर शिराळा येथील डॉ शैलेश माने यांच्या खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. याबाबत अद्याप पंचनामा झालेला नाही. त्यामुळे घराचे किती नुकसान झाले हे समजू शकले नाही. शिराळा तालुक्यात १जून ते २४ जुलै अखेर पक्क्या व कच्या अशा ६५ घराची अंशतः पडझड झाली आहे.या संततधार पावसामुळे जुन्या मातीच्या घराची पडझडं होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
0 Comments