शिराळा ,ता.२१ :शिराळा तालुक्यातील एका गावातील आत्महत्या करणाऱ्या युवकाचे पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले अन त्याच्यासाठी उघडणारी स्वर्गाची दारे तत्काळ बंद झाली. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती पोलीस व ग्रामस्थांना आली. शिराळा पोलिसांनी वेळेत जाऊन आपल्याला अवगत असणाऱ्या सीपीआर पद्धतीचा वेळेत उपयोग करून त्या युवकाला मृत्युच्या जबड्यातून बाहेर काढले.त्यामुळे पोलीस हवलदार सुर्यकांत कुंभार व अरुण मामलेकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १९ जुलै रोजी शिराळा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार पोलीस हवलदार सुर्यकांत कुंभार व अरुण मामलेकर मदत डयुटीस होते. त्यांना डायल ११२ वरून एका महिलेचा फोन आला. त्यावेळी त्यांनी पती मला शिवीगाळ आणि मारहाण करीत असून जीव देण्याचा व घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी पोलीस मदत हवी असल्याचे सांगितले. त्यावेळी सुर्यकांत कुंभार व अरुण मामलेकर या दोन्ही पोलिसांनी त्या महिलेशी पुन्हा फोन वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.परंतु तिने फोन उचलला नाही. त्यावेळी त्या दोघांनी त्या गावात जाऊन महिलेच्या नावांवरून चौकशी केली. परंतू स्थानिक लोकांच्या कडून कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही. मात्र १८ जुलै रोजी रात्री. सदर महिलेने डायल ११२ फोन केला असल्याने रात्रपाळीचे अंमलदार पोलीस हवलदार मुलाणी व विकास शिंदे हे त्या गावात गेले होते. त्यावेळी तिचा पती घरी व आजु बाजूला आढळला नाही. सदर महिला माहेरी गेली होती. त्यामुळे पोलीसांनी तिला तुम्ही तक्रार देणेसाठी पोलीस ठाण्यात या असे सांगून ते परत आले होते. त्यामुळे सदर महिला व तिच्या पतीचे नाव व गाव याची माहिती पोलीस कुंभार व मामलेकर यांना पोलीस मुलाणी व शिंदे यांनी दिली. त्या वरून पोलीस कुंभार व मामलेकर हे त्या युवकाच्या घरी पोहचले असता घरचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे पोलिसांनी पाठीमागील दरवाजाकडे जावून पाहिले असता तो ही आतून बंद असल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे समोरचा दरवाजा त्यांनी तोडून आत प्रवेश केला.त्यावेळी तो युवक साडीने गळफास लावलेले स्थितीत आढळून आला. त्याला खाली उतरवले असता तो बेशुध्द अवस्थेत होता. त्याच्यावर हवलदार कुंभार यांनी त्वरीत सीपीआर उपचार केला व अरुण मामलेकर यांनी प्राथमिक उपचार सुरु केले. त्यास सीपीआर व प्राथमिक उपचार मिळाल्याने त्याचा श्वास सुरु झाला. त्यामुळे त्यास लोकांचे मदतीने खाजगी वाहनाने त्वरीत उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथे उपचारास दाखल केले. त्याचे प्राण वाचले. सध्या तो सुखरूप आहे.
0 Comments