शिराळा :येथे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन खासदार धैर्यशील माने व सत्यजित देशमुख यांना देताना आशा गटप्रवर्तक सविता पाटील,शोभा पाटील,सुनिता कुंभार,मीना रावते,सारिका कासार ,दिपाली जाधव,मनीषा पाटील |
शिराळा,ता.१९: आशा गटप्रवर्तक यांच्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेवून समन्वयातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले.
शिराळा येथे आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात दहा हजार रुपये वाढ करावी,संप काळात कपात केलेले मानधन द्यावे व कंत्राटी कर्मचाऱ्या मध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करावा या मागणीचे निवेदन शिराळा तालुक्यातील गट प्रवर्तक संघटनेच्यावतीने खासदार धैर्यशील माने यांना देण्यात आले. त्यावेळी बोलत होते.यावेळी हातकणंगले लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या निवेदनात म्हटले आहे,२०२४ मध्ये गटप्रवर्तकांना एक हजार रुपये एवढी अत्यल्प वाढ केलेली आहे. सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येमध्ये काम करणाऱ्या उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना अत्यल्प वाढ केल्यामुळे राज्यातील सर्व गटप्रवर्तक नाराज आहेत. राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये गटप्रवर्तक गेल्या पंधरा वर्षापासुन काम करत आहेत. संपा दरम्यान आरोग्य मंत्री यांनी गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधनात वाढ देण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ करुन शासनाने त्यांची चेष्टा केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. गटप्रवर्तकांना प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे पंचवीस आशा स्वंयसेविकांवर देखरेख करावी लागते, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात महिन्याला २५ दिवस दौरे करुन आशांना भेटी देवुन त्यांना मार्गदर्शन करावे लागते. त्यांना मिळणारे मानधन हे त्यांच्या प्रवासावर खर्च होते. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यातुन रक्कम शिल्लक राहत नाही. तेव्हा गटप्रवर्तकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात यावी.१६ मार्च २०२४ रोजी कृति समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना भेटुन गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत निवेदन दिले आहे. त्यांनी गटप्रवर्तकांच्या मानधन वाढीच्या जि.आर. मध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सुधारीत जि.आर. त्वरीत काढावा. १४ मार्च २०२४ रोजी निर्गमीत केलेल्या जि.आर. मध्ये गटप्रवर्तकांना एक हजार रुपये एवढी अत्यल्प वाढ केलेली आहे. जि.आर. मध्ये दुरुस्ती करुन गटप्रवर्तकांना दरमहा दहा हजार रुपये वाढ करण्यात यावी. गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविकांचे संप काळातील कपात केलेले मानधन त्वरीत देण्यात यावे. गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये समावेश करुन त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ देण्यात यावे. याबाबत केंद्र शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करुन तो मंजुर करुन घेवुन गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये समावेश करण्यात यावा.यावेळी गटप्रवर्तक सविता पाटील, शोभा पाटील, सुनिता कुंभार, मीना रावते, सारिका कासार,दिपाली जाधव,मनीषा पाटील उपस्थित होत्या.
0 Comments