शिराळा,ता.१३:केंद्र सरकारने साखर,इथेनॉलबाबत निर्यातीचे धोरण किमान पाच ते सात वर्षासाठी कायम ठेवावे.म्हणजे साखर कारखानदारीत शाश्वतता निर्माण होईल.सन २०२४-२५ गळीत हंगामात विश्वास कारखाना सात लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप उद्दीष्ट पूर्ण करेल असे प्रतिपादन विश्वासराव नाईक कारखाण्याचे अध्यक्ष,आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील कारखाण्यात आज हंगाम २०२४-२५ साठीच्या रोलर पुजन प्रसंगी बोलत होते. प्रारंभी कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील यांनी स्वागत केले.संचालक डॉ. राजाराम पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा व रोलर पूजन झाले.
यावेळी नाईक म्हणाले,गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उसाचे उत्पादन घटले होते. परंतु यावर्षी वेळेत पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा उस लागणीकडे वळला आहे. वेळेत पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा आनंदी आहे.साखर कारखानदारीला ऊसाची कमतरता भासणार आहे. विश्वास कारखान्याने सात लाख मेट्रिक टन गाळापाचे उद्दीष्ट ठेवले आहे.
केंद्र सरकारने साखर व इथेनॉल निर्यातीचे धोरण निश्चित केले नसल्याने उत्पादनावरती मर्यादा येत आहेत.निर्यातीचे धोरण किमान सात वर्षांपर्यंत निश्चित झाल्यास साखर व इथेनॉल निर्यातीचे योग्य नियोजन करून त्यानुसार उत्पादन क्षमता वाढविणे शक्य होईल. इथेनाँल निर्मितीसाठी कारखान्याने १०० ते २०० कोटींची गुंतवणूक केलेली आहे. परंतु केंद्र सरकारकडून इथेनाँल निर्मितीचे धोरण निश्चित नसल्याने कारखानदारांवरती याचा ताण पडत आहे. त्यामुळे सहाजिकच कारखानदारी तोट्यात येऊ लागली आहे व याचा ताण शेतकरी वर्गावरही पडत आहे. धोरण निश्चित झाल्यास इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे विस्तारीकरण करणे शक्य होईल. उसाच्या दर निश्चिती प्रमाणे साखरेच्या दरही निश्चितीही गरजेची आहे. तरच भविष्यात सहकारी साखर कारखाने टिकतील.
यावेळी संचालक विराज नाईक,दिनकरराव पाटील,विश्वास कदम, सुरेश चव्हाण,विजयराव नलवडे,सुरेश पाटील,बिरुदेव आमरे, बाबासो पाटील,यशवंत निकम,शिवाजी पाटील,बाळासाहेब पाटील,संदीप तडाखे,तुकाराम पाटील,विश्वास पाटील,दत्तात्रय पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक अमोल पाटील,कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील,कामगार संघटना अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजयराव देशमुख, यु.जी.पाटील, सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी, सभासद आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments