आष्टा, ता. ११ :नवीन दुचाकीवरून मित्राला बहादूरवाडी येथे सोडायला निघाले असताना समोरून आलेल्या वाहनाच्या दिव्याचा प्रकाश डोळ्यावर पडल्यामुळे झालेल्या अपघातात दोन मित्र ठार झाले. तर एक जखमी झाला. ही घटना नागाव भडकंबे मार्गावर काल घडली.याबाबतची फिर्याद जखमी ओंकार नामदेव कदम (वय, २६, नागाव, निमणी, ता. तासगाव. सध्या पलुस) याने आष्टा पोलिस ठाण्यात दिली. संदेश तानाजी सावंत (सिंधुदुर्ग) व बाळासो सूर्यकांत जाधव (बहादुरवाडी, ता. वाळवा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की ओंकार कदम व संदेश सावंत हे दोघे बाळासो जाधव याला बहादूरवाडी येथे घरी सोडायला उशिरा दुचाकी (एमएच १० इएच २९४९) वरून जात असताना, समोरून आलेल्या वाहनाच्या दिव्याचा प्रकाश डोळ्यावर पडल्यामुळे दुचाकी चालवत असलेला संदेश सावंत गडबडला. दुचाकी रस्त्याच्या बाजूला घ्यायच्या प्रयत्नात दगडी कठड्यावर जाऊन आदळली. जोराचा धक्का बसल्यामुळे संदेश सावंत व बाळासो जाधव हे ओढ्यात फेकले गेले. ओढ्यात असलेल्या दगडावर डोके आपटल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते दोघे ठार झाले. जखमी ओंकार कदम याच्यावर उपचार सुरू आहेत. आष्टा पोलिस तपास करत आहेत.
0 Comments