शिराळा,ता.२२: वाकुर्डे योजनेच्या कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे, जमिनींचे नुकसान झाले आहे. त्याचे महसूल विभागाने पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवावा. जलसंपदा विभागाने होत असलेली कामे दर्जेदार कशी होतील याकडे लक्ष द्यावे अशा सूचना आमदार मानसिंगराव नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
वाकुर्डे बुद्रूक ता.शिराळा येथील वाकुर्डे योजनेच्या कालव्याची गळती होऊन झालेल्या शेती व शेतजमीनीच्या नुकसान भरपाई मिळण्या बाबत बळीराजा शेतकरी संघटना व गरजवंत शेतकऱ्यांनी वाकुर्डे येथे आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालयात आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस तहसीलदार श्यामला खोत-पाटील, प्रशिक्षणार्थी तहसीलदार संतोष आठरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील व शेतकरी उपस्थित होते. यावेळी नाईक म्हणाले, कालव्याची गळती असलेल्या ठिकाणची गळती त्वरित काढावी. एकाही शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अथवा जमिनीचे नुकसान होणार नाही, याकडे लक्ष द्या. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पाटबंधारेचे उपविभागीय अभियंता अमोल कमलाकर, गुरू महाजन, प्रकाश बंडगर, सहाय्यक अभियंता अनिल लांडगे, अंत्री बुद्रुकचे माजी उपसरपंच सुनील पाटील, निवृत्ती शेटके, जगन्नाथ शेटके, हणमंत माने, भाऊसो जाधव, गोरख शेटके, बाळकू शेटके, डॉ.सुनील पाटील, कृष्णा शेटके, बाळू शेटके व इतर शेतकरी उपस्थित होते.
0 Comments