शिराळा: पोलिस निरीक्षक आनंदा रामचंद्र वरेकर यांनी पोलिस खात्याची एकूण 37 वर्षे प्रामाणिक व निकोप सेवा केली. त्यांच्या माध्यमातून राज्यातील विविध पोलिस प्रशिक्षण केंद्रात अनेक अधिकारी व पोलिस घडले. ते कठोर प्रशिक्षक व हृदयस्पर्शी व्यक्तिमत्त्व राहिले. अशा भावना व्यक्त झाल्या.
रेड (ता. शिराळा) येथील ऐश्वर्या मल्टिर्पपज हॉलमध्ये पोलिस निरीक्षक श्री. वरेकर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पर पडला. निवृत्त पोलिस निरीक्षक श्री. वरेकर याचे मूळ गाव (खवरेवाडी, ता. शिराळा) असून त्यांनी मुंबई पोलिस दलातून खात्यात सेवा देण्यास सुरवात केली. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक, दौंड, तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दीर्घकाळ काम केले. या काळात त्यांच्या माध्यमातून अनेक अधिकारी व पोलिसांना प्रशिक्षण मिळाले. तसेच अहमदनगर व कोल्हापूर येथे सुद्धा कर्तव्य बजावले व तुरची येथील प्रशिक्षण केंद्रात 5 वर्षे सेवा बजावून ते निवृत्त झाले. एकूण कार्यकाळात त्यांनी केलेले काम प्रेरणादायी आहे. ते कठोर प्रशिक्षक व प्रत्येकाला मदतीची भूमिका घेऊन काम करणारे अधिकारी म्हणून परिचित होते निवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्यदायी व सुख-शांतीमय जावो, अशा भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या.
प्रारंभी स्वागत सहा. फौजदार तानाजी वरेकर यांनी केले. प्रास्ताविक आनंदा जाधव यांनी केले. आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सौ. सुनितादेवी नाईक, निवृत्त पोलिस उपअधिक्षक शिवाजीराव जमदाडे, माजी सरपंच प्रमोद नाईक, माजी नगरसेवक विश्वप्रताप नाईक, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी पाटील, अनिल बावस्कर, तानाजी भोसले व गणेश पवार, चांदोलीचे वनपाल शिवाजी पाटील यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यापार, व्यवसाय आदी क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, नातेवाईक आदींनी भेटून श्री. वरेकर यांचा सपत्निक सत्कार केला व भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या. शिक्षक सहदेव खोत यांनी सूत्रसंचालन केले. पुनवतचे पोलिस पाटील बाबूराव वरेकर यांनी आभार मानले.
0 Comments