शिराळा,ता.१६ :सागाव ( ता.शिराळा ) येथे सापडलेल्या व्हेल मासा उल्टी (अंबरग्रीस ) तस्करीच्या तपासासाठी वनविभागाने दोन पथके तयार केली आहे.या मध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेट असलेची शक्यता आहे का याची माहिती घेण्यासाठी व इतर आरोपींच्या शोधासाठी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी उपवनसंरक्षक निता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे ,मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथके रवाना झाली आहेत.
काल शुक्रवारी ता.१५ रोजी व्हेल मासा उल्टी (अंबरग्रीस ) तस्करी प्रकरणी सांगली,कोल्हापूर,लातूर जिल्ह्यातील रोहन सर्जेराव पाटील (वय २९ रा. कोनवडे ता. भुदरगड जि. कोल्हापूर), प्रथमेश सुरेश मोरे (वय २३ वर्षे रा.सोळंबी, ता. राधानगरी,जि. कोल्हापूर) , दिग्विजय उत्तम पाटील (वय २४ रा.सागाव, ता.शिराळा, जि. सांगली ), लक्ष्मण सुखदेव सावळे ( वय ३४ रा.लातूर सध्या रा. कळंबोली मुंबई ) ,दत्तात्रय आनंदराव पाटील ( वय वर्षे ४१ रा. बिऊर ता. शिराळा, जि. सांगली) या पाच जणांच्या टोळीला बनावट ग्राहकाच्या मदतीने सागाव येथे वन विभागाने मोठ्या शिताफीने अटक केली होती. त्यांच्या कडून ८ ग्रॅम उलटी चा नमुना ,पाच मोबाईल,दोन मोटारसायकल जप्त केल्या होत्या. त्या नंतर त्यांना शिराळा न्यायालयात हजर केले असता गुरवार ता.२१ डिसेंबर पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.पुढील तपासात आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस होण्याची दाट शक्यता असून तपासात आणखी नावे निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दोन वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरु आहे. या घटनेमुळे शिराळा तालुक्यासह सांगली कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
उपवनसंरक्षक निता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे ,मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक हणमंत पाटील, विशाल डुबल,भिवा कोळेकर,रजनिकांत दरेकर,बाबासो गायकवाड,मोहन सुतार यांच्या पथकाने केली. पुढील तपास वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी करत आहेत.
व्हेल माशाची उल्टी (Ambergris) हे वनविभागाचे अनुसुची एक मध्ये येत असून त्याच्या तस्करीसाठी ३ ते ७ वर्षाची शिक्षा व २५००० रू. दंडाची तरतूद आहे.
निता कट्टे उपवनसंरक्षक (प्रा.) सांगली
0 Comments