शिराळा,ता.१६: शिवणी परिसरात खेड ( ता.शिराळा ) येथील जगन्नाथ पांडुरंग शिरतोडे यांच्या गाभण शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले.उसात बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत घटना स्थळावरून समजलेली माहिती अशी, जगन्नाथ शिरतोडे व सचिन माने याचा ९० शेळ्या मेंढरांचा कळप आहे.त्यामध्ये १० शेळ्या आहेत.काल शुक्रवार त्यांना चारण्यासासाठी शिवणी परिसरात नेले होते.सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यातील काही शेळ्या उसात गेल्या.त्या बाहेर आल्या नंतर त्यांना घरी नेण्यात आले. त्यावेळी एक शेळी कमी असल्याचे आढळून आले. त्यानंतर चारावयास नेलेल्या ठिकाणी जगन्नाथ शिरतोडे, नथुराम शिरतोडे व सचिन माने हे शेळी शोधण्यासाठी गेले. मात्र अंधार असल्याने ती मिळून आली नाही. त्यानंतर आज शनिवारी सकाळी जगन्नाथ शिरतोडे यांनी पुन्हा त्या परिसरात शोध घेतला .पण त्यांना काहीच आढळून आले नाही. शिवणी येथे असणाऱ्या वस्तीवरील कुत्री उसाकडे पाहून भुंकू लागली. त्यामुळे शेतकऱ्याने उसात जाऊन पाहिले असता शेळी मृतावस्थेत आढळून आली.शिरतोडे याची शेळी काल पासून गायब असल्याची माहिती असल्याने त्यांनी शिरतोडे यांना याची कल्पना दिली.
याबाबत वन विभागास कळविले असता वनरक्षक हणमंत पाटील,डॉ. शुभांगी अलगडे,अनिल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. यावेळी मारुती रोकडे, दिग्विजय पाटील, जगन्नाथ शिरतोडे, नथुराम शिरतोडे उपस्थित होते.
चौकट -कोकरू गायब
पाच दिवसापूर्वी याच परिसरात मेंढरे चारत असताना शशिकांत वगरे यांचे कोकरू गायब झाले आहे. ते अद्याप सापडले नाही,त्यामुळे ते बिबट्याने च गायब केले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
0 Comments