पुणे : साखर आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे जय शिवराय किसान शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील व इतर
शिराळा,ता.४:वजन काट्यात हेराफेरी करताना सापडतील त्या कारखान्यांची सापडलेल्या दिवसापासून ते गळीत हंगाम सुरू झालेल्या दिवसापर्यंत जेवढे गाळप केलेले त्या प्रमाणात वजन चोरी ग्राह्य धरावी. सदरच्या वजन केलेल्या उसाचे निघणाऱ्या दाराप्रमाणे सर्व रक्कम कारखान्याच्या संचालक मंडळाकडून व एम डी यांच्याकडून वैयक्तिक संपत्तीतून वसूल करून ती शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी जय शिवराय किसान शेतकरी संघटनेने पुणे येथे साखर आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, वाढीव उत्पादन खर्चाचा विचार करता उसाला प्रतिष्ठान पाच हजार रुपये दर मिळावा. गुजरात मधील गणदेवी साखर कारखान्याने एफ आर पी च्या कायद्यानुसारच साडेअकरा टक्के रिकव्हरीला सरासरी ३६०० रुपये दर दिलेला आहे. याचा हिशोब करता १२ टक्के रिकव्हरी असणाऱ्या कारखान्याने ३७५० रुपये, १२.५० टक्के असणाऱ्या साखर कारखान्याने ३९०० रुपये, तर १३ टक्के असणाऱ्या कारखान्यांनी ४०५० रुपये दर मागील हंगामातील द्यायला हवा. एफ आर पी च्या सूत्रानुसार विचार केल्यास मागील गळित हंगामातील साखर कारखान्यांनी अजून किमान ८०० ते १००० रुपये देणे शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. जे कारखाने याशिवाय प्रत्येक साखर कारखान्यांनी उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिशोब वेगवेगळा देण्यासाठी संघटनेने मागणी केली. विज निर्मिती, केमिकल, इथेनॉल, मद्यार्क असे अनेक उपपदार्थ कारखानदार बनवत असतात. यातून नेमके किती उत्पन्न मिळाले हे सविस्तरपणे वार्षिक अहवालामध्ये दाखवत नसतात. तरी इथून पुढे प्रत्येक उपपदार्थाचा हिशोब वेगवेगळ्या देऊन त्यातील नफा शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
याबाबत साखर आयुक्त फुलकुंडवार यांनी सकारात्मक निर्णय घेऊन, लवकरच कारखान्यांना तसे परिपत्रक काढले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने, राज्याचे अध्यक्ष श्यामसुंदर जायगुडे, सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष दत्ता गोते, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पाटील, सदाशिव कुलकर्णी, उत्तम पाटील, अविनाश पाटील, एन. पी. पाटील, शरद जोशी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष दीपक फाळके, जय शिवरायचे हवेली तालुकाध्यक्ष प्रवीण इंदुलकर, उदय कुमार पाटील, गब्बर पाटील, महेश मोहिते, शितल कांबळे, तातोबा कोळी, उत्तम पाटील, बाळू जाधव, प्रताप चव्हाण, बाळासाहेब वाघले, भरत गोते, चंद्रकांत पाटील, भैरवनाथ मगदूम उपस्थित होते.
0 Comments