शिराळा,ता.१३ : कापरी ता.शिराळा येथे पैशावरून झालेल्या भांडणातून महेश राजेंद्र मोरे (वय २७) या मोठ्या भावाचा डोक्यात लाकडी दांडके घालून खून केल्या प्रकरणी संशयित आरोपी लहान भाऊ अविनाश राजेंद्र मोरे( वय २२) यास शिराळा पोलिसांनी अटक केली.त्यास न्यायालयात हजर केले असता १६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटना शनिवारी मध्यरात्री रात्री १ वाजण्यापूर्वी घडली होती.याबाबत पोलीस पाटील बजरंग कुंभार यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती..संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे खून करून पसार झाला होता.
नमस्कार मी अविनाश मोरे
खून प्रकरणातील संशयित आरोपी अविनाश मोरेने पोलिसांच्या भीतीने स्वतः रविवारी रात्री शिराळा पोलीस ठाण्यात नमस्कार मी च अविनाश मोरे असे म्हणत मीच भावाचा खून केला असल्याची कबुली दिली. त्याच्या शोधासाठी डोंगर परिसरात दोन व प्रत्येक पाहुण्यांच्या घरी, धाब्यावर शोध,लॉज वर शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र पथक अशी तीन पथके तयार केली होती.त्यामुळे आपली नाकाबंदी झाल्याने आपली यातून सुटका होणार नाही याची जाणीव झाल्याने तो स्वतः हजर झाला असावा .
दोन चालक ३६ तास ऑन ड्युटी
शशिकांत लुगडे, अनुज पाटील या दोन चालकांनी खुन्याच्या तपासासाठी केलेल्या पथकाच्या गाडीचे ३६ तास अविरतपणे सारथ्य करत केले. त्यामुळे त्यांच्या या कामाचे सर्वांनी कौतुक केले.या पथकात पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम,,सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील, संदीप पाटील, कालिदास गावडे,अमोल साठे,बाबुराव पाटील, नितीन यादव, सूर्यकांत कुंभार,,सुरेश नलवडे, महेश गायकवाड, इरफान मुल्ला यांचा सहभाग होता.
बिबट्याची धास्ती अन आरोपीचा शोध
खून करून पसार झालेल्या अविनास याचा शिराळा पोलीस शनिवारी मध्यरात्री पासून शोध घेत होते. त्यासाठी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम ,सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार केली होती. त्यांना मिळालेल्या माहिती नुसार शेखरवाडी येथील तामजाई व रेड येथील सिदोबा डोंगर परिसर पालथा घालून त्याचा शोध घेतला.घनदाट जंगल व त्या परिसरात बिबट्या असल्याने अडचणीच्या ठिकाणी कोणी जाण्याचे धाडस करत नाही. अशा ठिकाणी जीवाची परवा न करत स्वत:पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम ,संदीप पाटील,कालिदास गावडे,अमोल साठे,बाबुराव पाटील, अनुज पाटील यांनी शोध घेतला.
0 Comments