शिराळा,ता.१९: केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. आपला निर्णय लवकर जाहीर करावा अन्यथा शांत असणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्यास शासनकर्त्यांना सळोकपळो करून सोडूच पण होणाऱ्या परिणामास शासनच जबाबदार राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष राम पाटील यांनी दिला.
शिराळा येथील बाह्य वळण रस्त्यावर आयटीआय समोर शिराळा -इस्लामपूर या मुख्य रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस दराबाबत केलेल्या चक्का जाम आंदोलन प्रसंगी बोलत होते. हे आंदोलन सुमारे एक तास सुरू होते. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात एस.टी .बस, मोटारसायकल ,चारचाकी वाहने यांच्या रांगा लागल्या होत्या. एक तास रस्ता रोको सुरु असल्याने एस.टी.बस मधून शिराळ्याकडे येणाऱ्या अनेक लोकांनी एक किलोमीटर पायी प्रवास करून शिराळा बसथानक जवळ केले. तर अनेकांनी पर्यायी मार्गाचा शोध घेवून पळ काढला.
यावेळी रवी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. हे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष राम पाटील ,रवी पाटील, प्रकाश पाटील, संजय शिंदे, अरविंद पाटील, बाळासाहेब दळवी, दिग्विजय शिंदे, सचिन पोकलेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments