BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मराठा आंदोलनास भारतीय दलित महासंघाचा पाठींबा |Indian Dalit Federation supports the Maratha movement





शिराळा,ता.३०:४० दिवसात मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन, त्यांचा बुद्धीभेद करून, त्यांचा विश्वासघात करणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा जाहीर निषेध व्यक्त करून भारतीय दलित महासंघाच्या वतीने मराठा आरक्षणास पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

 निवेदनात म्हटले आहे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचे केवळ राजकारण करत असून मराठा आरक्षणाबाबत हे असंवेदनशील असल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिणामी मराठा समाजात असंतोष पसरला असून आपल्या शैक्षणिक व नोकरी विषयक संविधानिक न्याय व हक्कासाठी आक्रमक झाला आहे. मराठा समाजातील बहुसंख्य कुटुंबे ही उपजीविकेसाठी शेती व शेतमजुरीचे  काम करत आहेत. ढासळत्या कृषी अर्थव्यवस्थेत शेती परवडत नसल्याने व शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आत्महत्या करू लागले आहेत. मराठा समाजाच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी मराठा राजकारणी सत्तेचा योग्य वापर करत नाहीत. महाराष्ट्रात काही मोजक्या परंपरागत मराठा वतनदार  घराण्याची  राजकारण, सहकार व शिक्षण संस्था निर्माण झाले आहेत. परंतु खरा अल्पभूधारक, कोरडवाहू, मजूर, भूमिहीन हा मराठ्यांचा प्रचंड मोठा वर्ग इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने दाबला आहे. परिणामी कर्ज काढून शेती गहाण ठेवून विकत उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुण वर्गामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. विकतचे उच्च शिक्षण घेऊन मराठा सुशिक्षित वर्गाला हलक्या दर्जाची कामे करावी लागत आहेत.शैक्षणिक व नोकरी विषयक टिकाऊ आरक्षण मिळावे म्हणून तरुण मराठा युवक आंदोलनादरम्यान आत्महत्या करू लागला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने मराठा समाजातील शेतकरी, कष्टकरी, आर्थिक दुर्बल घटकातील युवकांच्या परिस्थितीची संवेदनशील दखल घेऊन त्यांना शैक्षणिक व नोकरी विषयक क्षेत्रात टिकाऊ आरक्षण द्यावे. आंदोलनादरम्यान मराठा युवकावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना कायमस्वरूपी सरकारी नोकरीत समाविष्ट करून घ्यावी.

 यावेळी तालुका अध्यक्ष दयानंद शिवजातक,जिल्हाउपाध्यक्ष विनोद आढाव,दिलिप मोरे, अमोल बडेकर,विशाल खांडेकर, निलदीप कांबळे,प्रकाश पाटील,  धनाजी तुपारे,शशिकांत कांबळे, विनोद कांबळे, पिराजी थोरवडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments