शिराळा (प्रतिनिधी) : ‘विश्वास’ कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना शुद्ध निरोगी बियाणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कारखान्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचे मार्फत ‘‘उती संवर्धित’’ ऊस रोपांचे वाटप केले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी कारखान्यामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता शुद्ध निरोगी उती संवर्धित ऊस रोपांचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य शेती अधिकारी ए. ए. पाटील प्रमुख उपस्थितीत होते.
संचालक श्री. नाईक म्हणाले, महाराष्ट्रात ऊस बियाण्याचा बदल हा 6 टक्के आहे. ऊस उत्पादन वाढवण्याचे असेल तर हा बियाणे बदलाचा दर 33 टक्यापर्यंत वाढवणे गरजेचे आहे. उती संवर्धित रोपापासून बियाणे बदलाचा दर हा अधिक जलदरीत्या गाठता येऊ शकतो. या रोपामुळे अनुवंशिक दृष्ट्या शुद्ध बियाणे मिळते. कमी क्षेत्रामध्ये कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर दर्जेदार बियाणे निर्मिती करता येते. या बियाण्याची उगवण ही ८ ते ९ दिवस लवकर होते. तसेच उगवण क्षमताही 95 टक्के पेक्षा जास्त असते. ऊस उत्पादनामध्ये २० ते २५ टक्के वाढ होऊन साखर उताऱ्यात चांगली वाढ होते .
स्वागत व प्रास्ताविक उप ऊस विकास अधिकारी संदीप पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित शेतकरी विजय जाधव (शिराळा), बाजीराव पाटील (कापरी), दीपक सपाटे, जगन्नाथ चव्हाण, युवराज पाटील व दिलीप पाटील (कांदे), अर्जुन पाटील (तडवळे) या शेतकऱ्यांना कारखान्याचे संचालक विराज नाईक यांच्या हस्ते उती संवर्धित रोपे देण्यात आली. यावेळी शेती विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments