BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गणेशमुर्तीच्या डोळ्यांतून अश्रू’ गुन्हा दाखलची ‘अंनिस’ची मागणी |Annis's demand to file a case of 'tears from the eyes of Ganeshmurti'



शिराळा ,ता.२३ ः  चिंचोली ता. शिराळा येथे सचिन बापूराव जाधव यांच्या घरातील गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येत असल्याचे आज सकाळी आरती करण्यासाठी आलेल्या मुलांना दिसले. ही अश्रुची अफवा समाज माध्यमावर व गावात पसरली .त्यामुळे गणपती बघण्यासाठी लोकांनी जाधव यांच्या घरी गर्दी केली. त्याचे चित्रीकरण ही समाज माध्यमावर पसरले. त्यामुळे तालुक्यात सह जिल्ह्यात चिंचोली गाव चर्चेत आले. या गणेशमुर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येत असल्याच्या कथित चमत्काराचा दावा म्हणजे कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे संबंधिताविरोधात महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, प्रा. एस.के. माने यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, विज्ञान युगात असे चमत्काराचे दावे केले जातात हेच पुरोगामी महाराष्ट्राला कमीपणा आणणारे आहे. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते, ते कारण मानवी बुद्धीला समजते. संबंधित जाधव यांनी चमत्कार तपासणीची परवानगी दिली तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यामागचे कारण - विज्ञान लोकांना सांगू शकेल. जाधव यांनी त्यासाठी सहकार्य करावे. महाराष्‍ट्रात गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आहे. या कायद्याच्या कलम दोन नुसार "एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून, त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे; आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे, ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे." हा दखलपात्र गुन्हा आहे. या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार त्या भागातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे या कायद्याचे 'दक्षता अधिकारी' म्हणून काम करीत असतात. या दक्षता अधिकाऱ्यांनी संबंधित चमत्काराची सत्यता पडताळून पहावी, तथाकथित चमत्कार घडवून दिशाभूल केली असल्यास संबंधितावर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. पुरोगामी विज्ञानवादी महाराष्ट्रात असे कथित चमत्कार दाखवून जनतेची दिशाभूल करणे हे अत्यंत निषेधार्थ आहे. अशा तथाकथित चमत्कारावर जनतेने विश्वास ठेवू नये.

  गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंची अफवा सकाळी वाऱ्यासारखी गावात व परिसरात पसरल्याने कोकरूड, मोरेवाडी खुजगाव, शेड्गेवाडी  व इतर गावरून गणपती पाहण्यासाठी जाधव यांच्या घरी लोकांनी गर्दी केली होती. 

Post a Comment

0 Comments