शिराळा : वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी बंदिस्त पाईप लाईनने नेऊन या परिसरातील शेतकऱ्याच्यावर अन्याय केला आहे. या पाण्यावर पहिला हक्क शिराळा तालुक्याचा असून जोपर्यंत उत्तर भागातील सर्व गावांना पाणी मिळत नाही तोपर्यंत वाळवा तालुक्यात पाणी जाऊ देणार नाही.जमिनी आमच्या गेल्या आणि पहिले पाणी वाळवा तालुक्यात हा अन्याय सहन करणार नाही असा इशारा वारणा प्रकल्प पाणी संघर्ष समिती मार्फत पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी ते म्हणाले, बंदिस्त पाईपलाईन मुळे पाणी शिरशी, औंढी , निगडी ,भटवाडी, करमाळे, शिवणी , खेड यांना मिळत नाही. बंदिस्त पाईपलाईनमुळे पाण्यापासून वंचित राहणाऱ्या या गावांना शासकीय खर्चाने उपसा सिंचन योजनेतून शेताला पाण्याची व्यवस्था करावी. शिराळा तालुक्यात वाकुर्डे योजनेची महत्त्वाची कामे प्रलंबित ठेऊन वाळवा तालूक्यातील गावांना पहिले पाणी देण्यात राजकीय हेतू आहे. तो साध्य होऊन देणार नाही. शिराळा तालुक्यातील उत्तर भागातील तलाव पूर्ण भरल्या नंतर वाळव्याला पाणी द्या. आमचे तलाव रिकामे ठेवून वाळव्याला पाणी देण्यास आमचा विरोध राहील.
डावा कालव्याची कामे झाली आहेत. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. ८० मीटर उंचीच्या शासकीय खर्चाने होणाऱ्या ११ योजना अद्याप प्रलंबित आहेत. काळुंद्रे येथील एकच योजना पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता संघर्ष समिती मार्फत गावोगावी जाऊन जनजागृती करणार आहे. तालुक्यातील वंचित गावांना पाणी मिळत नाही तो पर्यंत पाणी संघर्ष सुरु राहील .
यावेळी या समितीचे प्रा.सम्राट शिंदे , प्रतापराव यादव ,अॅड रवी पाटील , साम्राटसिंह शिंदे, श्रीराम नांगरे- पाटील , अनिल घोडे ,अॅड. आर डी पठाण ,तुकाराम चव्हाण , अमर पाटील , प्रताप काळे, पोपट कदम ,आदी उपस्थित होते.
0 Comments