शिराळा,ता.२२: टेम्पो मागे घेत असताना बसलेल्या धडकेत जखमी झालेल्या सेवानिवृत्त शिक्षका सौ.शालन बापू पाटील( वय ७४ , मुळगाव बिऊर ,सध्या रा.आझाद कॉलनी ,शिराळा) यांचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथे मृत्यू झाला.
सदर घटना शनिवार (ता.२१) रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. याबाबत सुधीर आत्माराम पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसातून समजलेली माहिती अशी, येथील बसस्थानक व बाजार समिती समोर असणाऱ्या शिराळा इस्लामपूर रस्त्यावरुन शालन पाटील चालत आपल्या घरी जात होत्या.
दरम्यान टेम्पो मागे घेत असताना त्यांना टेम्पोची धडक बसली. त्यात त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागल्याने त्यांना शिराळा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले . मात्र त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास हवालदार दीपक खोमणे हे करीत आहेत. शालन यांच्या पश्चात पती निवृत्त मुख्याध्यापक बापू पाटील , दोन मुले , एक मुलगी , सुना , नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments