शिराळा,ता.२७ : गावागावातील सहकारी सोसायट्या सक्षम करण्यासाठी सोसायटी अध्यक्ष व सचिवांनी प्रयत्न केले पाहीजेत. सचिवांनी फक्त पगारासाठी काम न करता सोसायट्या स्वंयमपूर्ण करणेसाठी काम केले पाहीजे, नाही तर सचिवांना त्रास होईल असा निर्णय घेतला जाईल असा इशारा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिला.
भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लायन्स सेवा केंद्रात महाराष्ट्र राज्य सहकारी विकास मंडळ पुणे, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिराळा यांच्या मार्फत तालुक्यातील प्राथमिक कृषी पत संस्थांच्या व्यवसाय वृध्दीसाठी आयोजित कार्यशाळेत बोलत होते. महाराष्ट्र राज्य सहकार विकास मंडळाचे महाव्यस्थापक मिलींद आकरे , पांडूरंग जाधव, महाराष्ट्र राज्य सहकार विकास मंडळाचे सरव्यवस्थापक संजयकुमार सुद्रिक प्रमुख उपस्थिती होते.
यावेळी नाईक म्हणाले, पूर्वी गावातील सहकारी सेवा सोसायट्या स्वयंमपूर्ण होत्या. त्यामुळे गावेही स्वयंमपूर्ण होती. परंतु आता आधुनिकतेच्या युगात सोसायट्या मागे पडू लागल्या आहेत. शिराळा तालुक्यात ८९ सेवा सोसायट्या आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच सोसायट्या सक्षम आहेत. नाबार्ड कडून सोसायट्यांना १ टक्के व्याजाने विविध योजनांसाठी कर्ज पुरवठा केला जातो. परंतु शिराळा तालुक्यातून एकही सोसायटीने यासाठी नाबार्डकडे प्रस्ताव पाठवला नाही. सोसायट्यांचे अध्यक्ष हे आभ्यासू हवेत. गावामध्ये शेती संदर्भातील विविध व्यवसाय सुरू करून सोसायट्या सक्षम करायला हव्यात.
विकास मंडळाचे महाव्यस्थापक आकरे म्हणाले, राज्य सहकारी विकास महामंडळ हे सेवा सोसायट्या व शेतकर्यांसाठी काम करते. सोसायट्यांनी फक्त कर्ज पुरवठा करण्याचे काम न करता विविध व्यवसाय उभारून सोसायट्या कशा नफ्यात येतील, यासाठी काम केले पाहीजे. हे महामंडळ सोसायट्यांसाठी खत विक्री केंद्र, नाबार्ड व एन. सी. सी. बी. सी. चे विविध योजनांची माहीती सोसायट्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहे. १० हजार शेतकरी कंपन्या उभारणे व शेतीमालांना मार्केट तयार करणे, कृषी पर्यटनासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन देणे तसेच सोसायट्या ज्या उद्देषांनी स्थापन झाल्यात ते उद्दीष्ट पूर्ततेसाठी हे महामंडळ काम करते. याची सविस्तर माहीती यावेळी दिली.
पांडूरंग जाधव म्हणाले, सांगली हा क्रांतीकारकांचा जिल्हा आहे. कृषी क्षेत्रातही हा जिल्हा नक्कीच क्रांती घडवेल. यासाठी सोसायट्यांनी अधिकचा नफा मिळवणेसाठी विविध व्यवसाय उभारले पाहीजेत. यासाठी खते, बियाणे, औषधांची दुकाने उभारली पाहीजेत. त्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आशावासन दिले. या कार्यशाळेस शेतमाल तारण येजना व वखार महामंडळ योजनेचे भाऊसाहेब टेमगर, आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना सांगली जिल्हा समन्वयक विशाल पाटील यांनी या कार्यशाळेस मार्गदर्शन केले.
यावेळी अनेक गावातील सेवा सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिवांनी समस्या मांडल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समस्यांचे निवारण केले. शेती विभागप्रमुख आबा माने, श्रीरंग शेळके, साजीद मुलाणी आदींसह तालुक्यातील विविध गावांतील सोसायचीचे अध्यक्ष, सचिव, सभासद व जिल्हा बँकेचे सर्व फिल्ड आँफिसर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा बँकेचे तालुका विभागीय अधिकारी अशोक माने यांनी केले. तर आभार शिराळा तालुका सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक डी. एस. खताळ यांनी मानले.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments