आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्ष विश्वास कारखाना
जयंतराव पाटील , शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक
शिवाजीराव चौगुले:शिराळा
शिराळा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी अडचणीत आलेल्या शिवाजीराव नाईक यांच्या संस्थांचा मंत्री जयंतराव पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला आर्थिक कणा बनवले आहे. त्यामुळे तालुक्यातील भाजप कमकुवत करत आमदार मानसिंगराव नाईक यांचे पाठबळ वाढवत एका दगडात दोन पक्षी मारून या शिराळा विधानसभा मतदार संघात भाजपाचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे नियोजन केल्याने वाळव्याचा वाघ आणि शिराळचा नाग यांच्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरील मनोमिलांच्या चर्चेला उधान आले आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांची भूमिका काय रहाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
२०१४ ला शिवाजीराव नाईक यांनी भाजपात प्रवेश केला आणि आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्रीपद देण्याचे व २०१९ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आमदार द्या आम्ही तालुक्याला दोन आमदार देतो असे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन भाजपने पाळले नाही. उलट २०१९ ला अंतर्गत गटबाजीमुळे शिवाजीराव नाईक यांचा पराभव झाला. सत्यजित देशमुख यांची आमदारकी हे ही आश्वासनच राहिले. दरम्यानच्या काळात नाईक यांच्या संस्था अडचणीत असताना त्यांना भाजपकडून ठोस मदत मिळाली नाही. एकीकडे राजकीय खच्चीकरण आणि दुसरीकडे अडचणीत आलेल्या संस्था यामुळे नाईक यांच्या अडचणी वाढू लागल्या. राजकारण करण्यासाठी संस्था सक्षम असल्या पाहिजेत. नाईक यांच्या उद्योग समूहातील दीड हजारवर कर्मचाऱ्याचा व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची वाताहत रोखणे गरजेचे आहे. याची जाणीव ठेवत जो आपल्या संस्थाना आर्थिक पाठबळ देईल त्याच्या सोबत जाणे हाच एकमेव पर्याय नाईक यांच्या समोर आहे.
तालुक्यात राजकारण करत असताना कोणी कोणाच्या संस्थामध्ये हस्तक्षेप करायचा नाही हे शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख व आमदार मानसिंगराव नाईक यांनी पथ्य पाळले आहे. हे नुकत्याच झालेल्या विश्वास कारखान्याच्या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. सांगली जिल्हा बँक निवडणूकीत ही तिन्ही नेत्यांची समन्वयाची भूमिका सर्वांनी अनुभवली आहे. याच माध्यमातून मानसिंगराव नाईक यांच्यारूपाने शिराळा तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.नाईक यांची भाजपमध्ये होणारी गळचेपी व अडचणीत असणाऱ्या संस्था यांचा विचार करून मंत्री जयंतराव पाटील यांनी आपल्या करेक्ट कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. शिवाजीराव नाईक यांच्या जिल्हा बँकेत प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावावर जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी आपले राजकीय वैरत्व बाजूला ठेवत सकारात्मक निर्णय घेतल्याने संस्थेला आर्थिक बळ देण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने शिवाजीराव नाईक व मानसिंगराव नाईक यांच्यात जवळीकता निर्माण झाली आहे. जो अडचणीत मदत करतो त्याबद्दल सह्नभूती ही निश्चित रहाते. संस्था मार्गी लावण्यासाठी राजकारण गरजेचे आहे. राजकारणासाठी संस्था आणि कार्यकर्ता महत्वाचा आहे. त्यामुळे भाजपवर नाराजी व्यक्त न करता आपल्या संस्था व राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवाजीराव नाईक यांना योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मते आजमावून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यास कार्यकर्त्यांची ही सकारत्मक भूमिका असल्याचे चित्र जाणवत आहे.
कोट- "आम्हाला राजकारणा पेक्षा अडचणीत असणाऱ्या संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत करणे गरजेचे आहे.या संस्थावर दीड हजारावर कामगारांचे त्यांच्या कुटुंबाचे भवितव्य अवलंबून आहे.आम्ही भाजपवर ही नाराज नाही मात्र प्राप्त परिस्थिती नुसार निर्णय घेवू ."शिवाजीराव नाईक माजी राज्यमंत्री
0 Comments