तडवळे (ता. शिराळा) येथे ऊसतोड मजुराच्या कु. गणेश श्रीराम कांबिलकर (रा. मानकूरवाडी ता.जि .बीड ) सध्या तडवळे या पाच वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. याच गावात एका वर्षात ही दुसरी घटना घडल्याने तडवळे ग्रामस्थ व उसतोडणी मजूर यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
ही घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.या बाबत घटना स्थळावरुन समजलेली माहिती अशी, सायंकाळच्या साडे सहाच्या वाजण्याच्या सुमारास ऊस मालक शिवाजी तुकाराम पाटील रा. तडवळे यांच्या घोलात या नावाच्या शेतात ऊसतोड सुरु होती. दिवसभर तोडलेला उस सायंकाळी ट्रॅक्टर मध्ये भरण्याचे काम सर्व ऊसतोड मजूर करत होते. यावेळी गणेश व जय हे दोघे ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस बसलेले होते. त्यावेळी अचानक उसातून बिबट्यांने गणेश याच्यावर झडप घातली. त्यास जबड्यात पकडून बिबट्या पळू लागला. त्यावेळी दोरका दुरंदरे ऊसतोड महिलेने पाहिले. यावेळी तिने व इतर उसतोड मजुरांनी आरडाओरडा करून बिबट्याचा पाठलाग सुरु केला. बिबट्या जात असलेल्या मार्गावर १५ ते २० फुटाची उंच दरड असल्याने त्यास मुलास पटकन घेवून जाता आले नाही.लोक पाठीमागे लागल्याने त्याने मुलास तिथेच सोडून धूम ठोकली. त्यामुळे मुलाचे प्राण वाचले.
बालकास जखमी अवस्थेत उस मालक शिवाजी पाटील, सुभाष पाटील,अमृत पाटील व इतर ग्रामस्थांनी शिवाजी यांच्या गाडीतून शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्या मानेवर,हनुवटीवर व थोडी छातीवर जखम झाली आहे. डॉ. अनिरुद्ध काकडे,डॉ.गणेश राजमाने यांनी उपचार केले.पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठवण्यात आले. यावेळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख,वनरक्षक हणमंत पाटील,अक्षय शिंदे, क्षेत्रसहाय्यक बाबासाहेब गायकवाड यांनी भेट देवून पाहणी केली.
मुलाची प्रकृती व्यवस्थित
मुलास मानेवर, हनुवटीवर जखम झाली आहे.थोड्या प्रमाणात छातीवर आहे. त्याच्या सांगली येथे सर्व तपासण्या केल्या आहेत. सर्व व्यवस्थित असल्याने घाबरण्याची गरज नाही.
सचिन जाधव वनक्षेत्रपाल
दोन युवक बचावले
तडवळे गावात काल सोमवारी सकाळी साडे सात वाजता वैरण आणण्यासाठी गेलेल्या गाव विहीर परिसरात प्रकश सर्जेराव पाटील या युवकावर उसात दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आज मंगळवारी सकाळी गणेश शिवाजी पाटील यांच्यावर ही याच परिसरात बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या गुरगुरण्याच्या आवाजाने त्यांनी धूम ठोकल्याने ते बचावले.
मजूर धास्तावले,
२२ फेब्रुवारी २०२१ रोजी तडवळे गावातच कृष्णात शामराव पाटील यांच्या शेतात बीडच्या उसतोडणी मजुराच्या कु.सुफीयान शमशुद्दीन शेख या एक वर्षाच्या मुलावर हल्ला करून त्यास ठार मारले होते. त्यांतर पुन्हा त्याच पद्धतीचा मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.मजूर मजुरांच्या मानता धास्ती निर्माण झाली आहे.
0 Comments