शिराळा : चांदोली परिसरामध्ये मधुमक्षिका पालन व्यवसायास मोठी संधी असल्याचे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र तडसरचे विषय विशेषज्ञ गणेश पवार यांनी केले.
सोनवडे, (ता. शिराळा ) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी मधुमक्षिका पालन व बांबू लागवड या विषयांवर आयोजित प्रशिक्षण प्रसंगी बोलत होते.
यावेळी भारतामध्ये आढळल्या जाणाऱ्या मधमाश्यांच्या विविध प्रजाती, मधमाश्यांचे जीवनचक्र, मधुमक्षिका पालनाच्या विविध पद्धती, आधुनिक पद्धतीने मधुमक्षिका पालन कसे करावे तसेच त्यासाठी लागणारे साहित्य, मध व मेणासोबतचं उत्पादित होणारी इतर विविध उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांना होणारा आर्थिक फायदा, त्यासोबतच हा व्यवसाय सुरू करताना नवीन मधपाळांसाठी असणाऱ्या शासकीय योजना यांबद्दल याबद्दल छायाचित्रे व चित्रफिती दाखवून पवार यांनी माहिती दिली.
चांदोली अभयारण्य परिसरातील संपन्न वनराई आणि आजूबाजूच्या भागातील शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा कमी प्रमाणात केला जाणारा वापर यामुळे मधुमक्षिका पालन व्यवसायासाठी पोषक वातावरण असून नैसर्गिक व शुद्ध मधाच्या उत्पादनासाठी या परिसरात मोठी संधी असल्याचे पवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमास उपसरपंच संजय जाधव, माजी सरपंच सुधीर बाबर, माजी चेअरमन शिवाजी पाटील, बापू पाटील, लक्ष्मण कंदारे,रवी पाटील, महिला बचत गट संघटक संगीता बाबर , हसीना मुल्ला , मंडल कृषी अधिकारी अरविंद शिंदे, कृषी पर्यवेक्षक गणेश क्षिरसागर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल माळी व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विकास बजबळकर उपस्थित होते.
0 Comments