भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. विसाव्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली असली तरी भारतामध्ये सर्वात आधी १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. आपल्याकडे जरी हा दिवस ५ सप्टेंबरला साजरा करण्यात येत असला तरी जगभरात वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. पाच ऑक्टोबरला जगातील अनेक देशात शिक्षक दिन असतो. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी येथे ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करतात.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी झाला. त्यांनी आंध्र आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरू पद भूषविले. नंतर १९३१ ते १९३९ या आठ वर्षांच्या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९४९ ते १९५२ मध्ये भारत सरकारने रशियातील भारताचा राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती केली. १९५२ मध्ये ते भारतात परतले, त्यानंतर १९५२ ते १९६२ या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषविले. १४ मे १९६२ रोजी ते भारताचे राष्ट्रपती झाले. १९५४ साली भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताबही बहाल केला होता. सर्वपल्ली यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी १६ वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी ११ वेळा नामांकन मिळाले होते. १७ एप्रिल १९७५ मध्ये त्यांचे चेन्नई येथे निधन झाले.
0 Comments