शिराळा: मांगले कांदे रस्त्यावर मांगले गावच्या हद्दीत सावर्डे फाटा येथे प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या शिवतेज विनायक घाटगे (वय १८) याचा कोल्हापूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला असून मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
शिवतेज याला झालेल्या मारहाणी बद्दल दीपक यशवंत हांडे (वय ४८) रा. सातवे ता.पन्हाळा यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे.
ही घटना बुधवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी, दीपक हांडे हे त्यांची फकिरवाडी येथे विकलेली म्हैस सोडण्यासाठी शिवतेजचा टेम्पो घेऊन जात होते.दरम्यान सहा महिन्यांपूर्वी मुलगी पळवून नेल्याचा राग मनात धरून मोटर सायकल वरून येऊन मांगले कांदे रोडवर सावर्डे फाटा येथे भाऊसो बाजीराव दळवी,पतंग विकासराव दळवी, सौरभ भाऊसो दळवी, अजय विजय दळवी,सर्व रा.सातवे ता.पन्हाळा यांनी शिवतेजला मारहाण केली.त्यात तो गंभीर जखमी झाला होता.
हा प्रकार हांडे यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन करून सांगितला. नातेवाईकानी मांगले भागातील घटनास्थळी धाव घेऊन त्याला कोडोली पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याला प्रथम उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तो चालत व बोलत होता. रात्री वैद्यकीय तपासणीसाठी त्याला कोल्हापुरात आणले. पण मध्यरात्री त्याची प्रकृती अधिकच खालावली. पुढील उपचारासाठी त्याला सीपीआर रुग्णालयात हलवले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मारेकऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना तात्काळ अटक करा त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका घेतली. शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सीपीआरला भेट दिली आहे.
0 Comments