BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ताटातूट झालेले ते लेकरू अखेर आईच्या कुशीत विसावले

 


शिराळा:वाकुर्डे बुद्रुक (ता.शिराळा) येथे तब्बल एक आठवड्याने झालेली माय लेकरांची भेट ही सर्वांचे मन हेलावून टाकणारी व ते दृश्य पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारी होती. ही सत्य घटना आहे ताटातूट झालेल्या मुक्या प्राण्यांची म्हणजे वानरांची.

 वाकुर्डे बुद्रुक येथील वाकेशवर मंदिरा जवळ एक वानराचे पिलू गावातील लोकांना खाली पडलेलं सापडले. त्यांनी  येथील प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या वन्यजीव आपत्कालीन सेवा दलातील रेस्कुअर अविनाश पाटील यांच्याकडे ते आणून दिले. 


रेस्क्यू टीमने त्याची माहिती वनविभागाला दिली. त्या पिलास गावातीलच असणारे वनकर्मचारी दादासो शेटके यांच्या  मार्गदर्शनाखाली खाऊ घालून सुरक्षित ठेवले.

 त्यास त्याच ठिकाणी परत आईकडे सोडणे हे सर्वात महत्त्वाचे होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रेस्क्यू टीमने वानरांच्या कळपाचा शोध घेतला. परंतु तो कुठे सापडला नाही. चुकीच्या कळपात सोडणे हेही पिलासाठी धोकादायक होते. म्हणून कळप मंदिराजवळ परत यायची वाट पहायची हे रेस्क्यू टीमने ठरवले. 

 चार दिवस गेले तरी ही कळप  परत न आल्याने रेस्क्यू टीमची चिंता वाढत होती. त्यांना चिंता पिलांच्या आईची होती.ती सुखरूप असावी हेच अपेक्षित होते. अखेर १० ऑगस्टला सायंकाळचे ५.३० वाजले होते आणि रेस्क्यू टीमला शेजारील काकींनी कळप आल्याचे कळवले. सर्व टीम आनंदी झाली. पिलांची आई सर्वात पुढे दिसली. बहुदा तिला तिच्या पिलांची चाहूल लागली असावी. पिलाचा आवाज ऐकताच ती कावरीबावरी झाली.ती आनंद आणि चिंता या दोन्ही अनुभवात भारावून गेली होती. झाडावर उड्या मारत होती. रेस्क्यू टीमने लगेच पिलू एका घराच्या छतावर सुरक्षित ठिकाणी ठेवले. पिलाला पाहताच वानर आई जवळच्या झाडावरून घरावर आली, तिने पिलाला छातीशी घट्ट कवटाळले आणि घराच्या उंच ठिकाणी घेऊन गेली. तिथे बसून ती सर्व रेस्क्यू टीम कडे पाहत आपल्या बाळाचा सांभाळ चांगल्या प्रकारे केल्याने सर्वांना धन्यवाद देत असावी.  हा सर्व सुखद क्षण पाहून रेस्क्यू टीम मधील सदस्यांना अश्रू अनावर झाले. निसर्ग खूप सुंदर आहे, आपण त्याला आपला मानून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. या रेस्क्यू अभिआयनात प्रादेशिक वनपरिक्षेत्र शिराळा, प्लॅनेट अर्थ फौंडेशन  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments