शिराळा, ता.१२: शिराळच्या नागपंचमीवर उद्या पोलीस, वनविभाग यांची करडी नजर असणार आहे. लोकांच्या असणाऱ्या हालचाली टिपण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर होणार आहे. पोलीस व वनविभाग यांनी अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांचा चारशेवर फौजफाटा तैनात केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शिराळा कडकडीत बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे.
न्यायालताच्या आदेशाचे पालन करत शिराळाकर जिवंत नागा ऐवजी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करणार आहेत.नागपंचमी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी लॉक डाऊन जाहीर करून काही निर्बंध घेतले आहेत. त्या नुसार १२ ऑगस्ट राजी सायंकाळी पाच वाजल्या पासून ते १४ ऑगस्टच्या सकाळी आठ वाजे पर्यंत बाहेरील नागरिकांना शिराळा येथे येण्यास बंदी घातली आहे. मंदिर परिसरात धार्मिक विधी लॉक डावूनच्या नियमाचे पालन करून होणार आहे. त्यासाठी पाच व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.पालखी साठी दहा व्यक्तींना पास देण्यात आले आहे. अंबामाता मंदिर नागरिकांच्यासाठी मंदिर बंद राहणार असून धार्मिक विधीसाठी ध्वनीक्षपक व वाद्यास बंदी घालण्यात आली आहे. शिराळा येथील नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये. पालखी सोहळ्यात अडथळा निर्माण करू नये.
दूध,दवाखाने, औषध दुकाने वगळता सर्व सेवा १३ ऑगस्टला बंद राहतील. सादर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
६५ नाग मंडळाच्या १४९ अध्यक्ष व कार्यकर्त्यांना कायदा व सुव्यवस्था याचे पालन करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आल्या आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी व्हावी म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने
११ पोलीस अधिकारी,१७५ पोलीस कर्मचारी,२० वाहतूक पोलीस,१९महिला पोलीस कर्मचारी, पाच व्हिडीओ कॅमेरे,दोन ध्वनी मापक यंत्र,दोन दंगल नियंत्रक पथक असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शिराळा शहरातील प्रमुख मार्ग व पालखी मार्ग येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.गुन्हे दाखल असणाऱ्या शहरातील दहा जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
वनविभागाने कडक बंदोबस्त ठेवला असून यामधे सहायक वनसंरक्षक दर्जाचे ४ अधिकारी , वनक्षेत्रपाल १८, वनपाल ३० वनरक्षक ५० यांचा समावेश आहे . सोबतच २ ड्रोन कॅमेरे , ६ व्हिडिओ कॅमेरे,१० गस्ती पथक , ६ फिरती पथके , १ श्वान पथक असणार आहे.
0 Comments