शिराळा: ३२ शिराळा मध्ये दरवर्षीप्रमाणे शासनाच्या आदेशानुसार जगप्रसिद्ध नागपंचमी साजरी होते. पूर्वीच्या काळी नागपंचमी साठी लोक आजूबाजूच्या भातशेती, जंगलातून, डोंगरातून जिवंत नाग पकडून आणत होते आणि जिवंत नागाची पूजा घरोघरी होत असे.परंतु गेल्या काही वर्षापासून शासनाच्या आदेशानुसार जिवंत नाग न पकडता मातीच्या नागाची पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. नगरपंचायत व प्लॅनेट अर्थ फौंडेशनच्या वतीने लोक जैवविविधता नोंदवही बनवण्यात आली आहे. या नोंदवही मध्ये शहरात आणि परिसरात आढळणारी जैवविविधता नोंद केली आहे.
यामध्ये परीसरात आढळणाऱ्या पशु, पक्षी, साप, कीटक, पिकांची वाण, झाडे, वेळी, झुडपे, तणांचे प्रकार,मातीचा प्रकार, तसेच गावांमध्ये असणारी जुनी मंदिरे, ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटन स्थळे अशा सर्व गोष्टींचा समावेश असतो. या नोंदवहीमध्ये गावातील रूढी, परंपरा आणि लोककला अथवा लोक ज्ञानाचा उल्लेख करावा असे सुचवण्यात आले आहे. यानुसार जग प्रसिद्ध नागपंचमीचा इतिहास व जुन्या लोकांची नाग पकडण्याची कला याची नोंद या लोक जैवविविधता वही मध्ये करण्यात आली आहे. गावच्या परंपरेनुसार पूर्वीच्या काळी लोक शेतीच्या बांधावरील बिळामध्ये असणारा नाग शोधून आणत असत. शेती बांध अथवा डोंगराच्या भागामध्ये असणाऱ्या बिळात साप आहे की नाही, तो कोणत्या जातीचा आहे, लहान अथवा मोठा आहे हे ओळखण्याचे येथील लोकांकडे कसब आहे. गावांमधील काही जुने जाणकार, काही तरुण, तज्ञ व्यक्ती अशा प्रकारचे ज्ञान अजूनही बाळगून आहेत. तसेच शिराळ्यातील लोक पकडलेल्या नागाला मातीच्या माठा मध्ये ठेवत होते. मातीचा माठ हा नैसर्गिक पर्याय वापरलेला होता, त्यामुळे याची नोंद सुद्धा महत्त्वाची ठरते. आपण नेहमी पाहतो कित्येक ठिकाणी विषारी- बिनविषारी साप भीती पोटी मारले जातात.शिराळकरांची कला व सर्प विषयक ज्ञान सर्प संवर्धनासाठी महत्वाचे ठरणार आहे. त्यासाठी या लोककला अथवा लोकांच्या ज्ञानाचा उल्लेख लोक जैवविविधता नोंदवहीमध्ये करणे फार महत्त्वाचे ठरते. भविष्यात प्रशासनाला आणि सर्प संशोधकांना देशातील सापांच्या संरक्षणासाठी लोकांच्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे स्थानिकांचे हे ज्ञान फार महत्त्वाचे राहते. लोक जैवविविधता नोंदवहीमध्ये स्थानिकांच्या या ज्ञानाबरोबरच, पालखीची पूजा परंपरा, नागपंचमीची मिरवणूक, नागपंचमी व गोरक्षनाथांचा इतिहास या सर्व बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. ही नोंदवही बनवण्यासाठी नगरपंचायत चे नगराध्यक्षा सुनीता निकम , मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच इतर सर्व नगरसेवक, नगरपंचायत चे कर्मचारी आणि त्याबरोबर प्लॅनेट अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील, उपाध्यक्ष प्रणव महाजन संस्थेचे सर्व सदस्य, नागरिक, नाग मंडळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
0 Comments