मुंबई, दि. २५ :- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट तथा शलाका भारत पाटणकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
" भारतातील सामाजिक चळवळी, लोकपरंपरा, संतसाहित्य अशा विविधांगी क्षेत्रात डॉ. आम्वेट यांनी संशोधक, अभ्यासक म्हणून तसेच स्त्रिया, वंचिताच्या न्याय हक्कांसाठी सक्रिय असे योगदान दिले आहे. समाजमनाशी एकरूप विदुषी म्हणून त्यांच्या या योगदानाची नोंद राहील. डॉ. गेल ऑम्वेट यांना भावपूर्ण श्रद्धांजली' असे मुख्यमंत्री यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
विचारवंत, समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्वेट यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 25: आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक, अभ्यासक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट तथा शलाका भारत पाटणकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून भारतीय समाज, आदिवासी जीवनपध्दती, लोकजीवन, भारतीय मौखिक परंपरा, संत साहित्य यांचा गाढा अभ्यास असणाऱ्या जेष्ठ विचारवंत, समाजशास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट या संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक होत्या. ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी त्यांनी विशेष कार्य केले. तथागत गौतम बुद्धांनी मांडलेल्या मानवतावादाच्या सिद्धांतासह, महात्मा ज्योतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान त्यांच्या सामर्थ्यासह त्यांनी आपल्या साहित्यातून नव्याने मांडले. क्रांतीवीर बाबूजी पाटणकर, क्रांतिवीरांगणा इंदुमती पाटणकर यांचा वैचारिक वारसा पुढे चालवत श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून त्यांनी डॉ. भारत पाटणकर यांना आयुष्यभर समर्थपणे साथ दिली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
0 Comments