शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने दुपारी चांदोली धरणाचे दोन दरवाजे उचलून पाणी सांडव्यातून वारणा नदीत पाणी सोडले जात आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन चरण-सोंडोली, बिळाशी-भेडसगाव, मांगले-काखे हे तीन महत्वाचे पूल पाण्याखाली गेले आहेत. तर कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव, मांगले-सावर्डे हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
वारणावती येथे १८५मि.मी. पावसाची नोंद झाली आहे चांदोली धरणात एका दिवसात दोन टी एम सी पाणी साठा वाढला आहे. वारणा व मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिराळा तहसीलदार कार्यालयात पूर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
नदीकाठच्या सर्व गावातील तलाठी व ग्रामसेवक यांना गाव न सोडण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत.
पूराचा धोका ओळखून मांगले, कोकरूड, सागाव, आरळा, येथे बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.
शिराळा इस्लामपूर राज्य महामार्ग वर शिराळा येथे झाड पडल्याने वाहतूक काही काळ बंद होती.
मोरणा व वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून नदी काठची पिके पाण्याखाली गेली आहे.
शेतात पाणी साठल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मेणी ओढ्यावर असणारा येळापुर-समतानगर पूल बुधवारी दुपार पासून पाण्याखाली आहे.
तालुक्यात करमजाई व अंत्री धरण, टाकवे, अंत्री, क्षमतेने भरले असून साडंव्यातून पाणी वाहू लागले आहे.
0 Comments